बँक घोटाळ्यात काँग्रेस नेते सुनील केदार दोषी

0

दोषी – सुनील केदार, अशोक चौधरी, केतन सेठ, सुबोध गुंडारे, नंदकिशोर त्रिवेदी, अमोल वर्मा

निर्दोष – श्रीप्रकाश पोद्दार, सुरेश पेशकर, महेंद्र अग्रवाल

 

नागपूर : काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५०कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी (Sunil Kedar) न्यायालयाने दोषी ठरविले आहे. केदार यांच्यासह एकूण सहा जणांना न्यायालयाने या घोटाळ्यात दोषी ठरविले असून त्यात बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक अशोक चौधरी, रोखे दलाल केतन कांतिलाल सेठ, सुबोध भंडारी, नंदकिशोर त्रिवेदी, अमित वर्मा यांचाही समावेश आहे.
काँग्रेस नेते सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष असताना हा घोटाळा झाला होता. या प्रकरणात एकूण ११ पैकी ९ आरोपींविरुद्ध ४०६,४०९, ४६८, ४७१, १२० (ब) आणि ३४ कलमान्वये न्यायालयात खटला सुरु होता. २००१-२००२ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या खाजगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी रोखे खरेदी केले होते. मात्र, पुढे या कंपन्यांकडून कधीच बँकेला खरेदी केलेले रोखे मिळाले नाही, ते बँकेच्या नावाने झाले नव्हते. धक्कादायक म्हणजे पुढे रोखे खरेदी करणाऱ्या या खाजगी कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या. या कंपन्यांनी कधीच बँकेला सरकारी रोखेही दिले नाही आणि बँकेची रक्कमही परत केली नाही असा आरोप आहे.तेव्हा फौजदारी गुन्ह्याची नोंद होऊन पुढे सीआयडी कडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. सीआयडीचे तत्कालीन अधिकारी किशोर बेले यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास झाला. तपास पूर्ण झाल्यावर 22 नोव्हेंबर 2002 रोजी सीआयडीने कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. हा खटला तेव्हापासून विविध कारणांनी प्रलंबित होता. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी २८ नोव्हेंबर रोजी या खटल्याचा निकाल सुनावणे अपेक्षित होते. मात्र, काही कारणांस्तव त्यांनी या प्रकरणाची सुनावणी १८ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली. त्यादिवशी झालेल्या सुनावणीतसुद्धा निकाल २२ डिसेंबरपर्यंत पुढे ढकण्यात आला.