वर्धा : हिंगणघाटच्या निवासी शाळेतील 75 विद्यार्थी कोरोनाग्रस्त |75 students of a residential school in Hinganghat found Corona positive.

वर्धा : राज्यात शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर पालकांमध्ये चिंता निर्माण करणारी बातमी पुढे आलीय. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट इथल्या निवासी शाळेतील 75 विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शाळेतील 30 विद्यार्थ्यांची बुधवारी आणि 45 जणांची गुरुवारी अँटिजेन चाचणी करण्यात आली होती त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय.  शाळेतील एकूण 247 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. 1 विद्यार्थी व 9 कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल प्रतीक्षेत आहे. तर 30 कर्मचाऱ्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. विद्यार्थ्यांना याच शाळेच्या वसतिगृहात विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यातील काहींना सौम्य लक्षण होती तर काहींना लक्षण देखील नव्हती. हिंगणघाट शहराच्या सातेफळमधील एका खासगी संस्थेचे निवासी वसतिगृह आहे. या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याला 4 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. या विद्यार्थ्यांवर शहरातील एका खाजगी डॉक्टरकडून उपचार सुरू होते. दरम्यान विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. बुधवारी वसतिगृहातील 39 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 30 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह निघाले. तर गुरुवारी वसतिगृहातील 247 विद्यार्थी आणि 30 कर्मचाऱ्यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. या चाचणीमध्ये आणखी 45 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.फक्त दोन दिवसात या निवासी वसतिगृहातील तब्बल 75 विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर येथे खळबळ आडाली आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लागण झालेले सर्व विद्यार्थी हे दहा ते बारा वर्षे या वयोगटातील आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.