विमानाच्या कबाडीत ९७ लाखांचा चुराडा

Share This News

विमानाच्या कबाडी स्कीममध्ये गुंतवणूक करून अनेक पटीने जास्त नफा मिळविण्याचे आमिष देऊन एका इसमास हैद्राबाद येथील दोन आरोपींनी ९७ लाख रुपयांनी फसविल्याची घटना कळमना हद्दीत समोर आली आहे. तर दुसर्‍या एका घटनेत जे.बी.एस. युनिकॉर्न कंपनीत अगरबत्ती व्यवसायात गुंतवणूक करण्यास लावून एका महिलेस आणि इतर २१ गुंतवणूकदारास दोन आरोपींनी ९ लाख ९२ हजारांनी फसविण्यात आले आहे.
कळमना हद्दीत प्लॉट क्र. ८, नेताजीनगर येथे राहणार्‍या कांतीलाल मकवाना यांना हैद्राबाद येथे राहणार्‍या सतीश रेड्डी आणि जयरामभाई मेघजी पटेल यांनी विमानाच्या कबाडी स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास ३ ते ४ महिन्यात ८ ते १0 पटीने नफा मिळणार असल्याचे आमिष दिले. त्यांच्याकडून त्या व्यवसायात ९७ लाखांची गुंतवणूक करून घेतली. त्यानंतर मकवाना यांना कोणताही नफा तर मिळालाच नाही. शिवाय त्यांनी लावलेली गुंतवणूकही त्यांना परत मिळाली नाही. याप्रकरणी मिळालेल्या तक्रारीवरून कळमना पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तब्बल २१ जणांना लुबाडले
गिट्टीखदान हद्दीत योगेंद्रनगर, बोरगाव येथे राहणार्‍या सारिकाला ऊर्फ नलिनी अनिल ठकारे यांना आणि इतर २१ गुंतवणूकदारांना ममता मडके रा. उदयनगर आणि प्रमोद खेरडे रा. आकाशनगर मानेवाडा यांनी संगनमत करून जी.बी.एस. युनिकॉर्न अगरबत्ती कंपनीच्या व्यवसायात १0.५00 रु. प्रमाणे गुंतवणूक करण्याकरिता भाग पाडले. त्याबदल्यात त्यांना दीडपट पैसे मिळेल, असे प्रलोभन देण्यात आले. सारिका आणि इतर लोकांकडून आरोपींनी गुगल पे आणि फोनद्वारे एकूण ९ लाख ९२ हजार रु. गुंतवणूक करून घेतली. दिलेल्या पैशांची मुदत संपल्यावर गुंतवणूकदारांनी पैशांची मागणी केली. पण, तेव्हा आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. ‘तुम्ही जी.बी.एस. युनीकॉन कंपनीत गुंतवणूक केली आहे, कंपनीने पैसे परत दिले नाही तर आम्ही काय करू’, असे आरोपींनी गुंतवणूकदारांना सांगितले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सारिका यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.