तो विनयभंग कसा? आमदार आव्हाडांनी राजीनामा देऊ नये-खासदार सुप्रिया सुळे

0

मुंबईः विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यावर राष्ट्रवादीचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule on MLA Jitendra Awhad`s Resignation Decision) यांनी या प्रकरणावर आपली भूमिका जाहीर केली आहे. आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. मुंब्रा येथील लोकांनी खूप विश्वासाने त्यांना निवडून दिले आहे. ते अतिशय चांगले काम करीत असून मंत्री असो किंवा नसो, मात्र आदर्श आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये, असे आवाहन सुळे यांनी केले आहे.
राज्यातील राजकारण ज्या पातळीवर जात आहे, त्याची आपल्याला चिंता वाटत असून सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की मी तो व्हिडीओ पाहिला. एकदा नाही, तर चार ते पाचवेळा पाहिला. कारण मीही एक महिला आहे. एक महिला जेव्हा तक्रार करते तेव्हा मी अगदी तटस्थपणे त्या महिलेच्या तक्रारीकडे पाहण्याचा प्रयत्न केला. ही घटना मुख्यमंत्री शिंदे यांच्या समक्ष घडली आहे. आव्हाड यांनी त्या गर्दीत माझे सहकारी श्रीकांत यांनाही हात लावला आणि बाजूला केले. तसेच त्यांनी समोरून येणाऱ्या त्या महिलेलाही बाजूला केले. त्यामुळे नेमका विनयभंग कसा झाला हे कळत नाही. हे गैरसमजातून आणि चुकीच्या संवादातून झाले आहे असे मला वाटते, असेही त्या म्हणाल्या. त्या महिलेची बाजू आपण ऐकून घेतली पाहिजे. मात्र, लगेच पोलीस स्टेशनला जाऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे टोकाचे पाऊल उचलणे किती योग्य, याचा सर्वांनी शांतपणे विचार करायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.

मिंट पाईन ॲपल पुलाव आणि लाल भोपळ्याचे घारगे | Mint Pineapple Pulao Recipe | Epi. 32 |Shankhnaad News