काँग्रेसला मोठा धक्का; अजित पवारांच्या उपस्थितीत 16 नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

भिवंडीतील काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे हे नगरसेवक काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.

भिवंडी महापालिकेतील महापौरपदाच्या निवडीपासून सुरु असलेल्या काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा फटका पक्षाला बसला आहे. काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादामुळे काँग्रेसचे 16 नगरसेवकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेससह दौंड येथील रासपच्या काही कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.  भिवंडीतील काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे हे नगरसेवक काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. या सर्व नगरसेवकांनी भाजपाला मदत केली म्हणून काँग्रेस पक्षाने नोटीस दिली होती. त्यानंतर आता या नगरसेवकांनी काँग्रेसलाच हात दाखवत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. तात्यासाहेब ताम्हाणे, पोपटराव बोराटे, चंद्रकांत कारंडे, दादासो भिसे, जनार्दन सोनवणे, प्रकाश टिळेकर, अशोकराव बोराटे, संतोष जाधव, शिवराम ताम्हाणे, आतिष बोराटे, सतिश खुने, बिभिषण खुने, संतोष ढोरले यांचा प्रवेश झाला, असं ट्विट राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली 16 नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असून 2 नगरसेवक बाहेरगावी असल्याने आज त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही लवकरच त्या दोघांचाही पक्ष प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीत होणार असून या पक्ष प्रवेशाने आपल्या प्रयत्नांना निश्चितच यश आले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जावेद फारुकी यांनी दिली आहे. तर जावेद फारुकी यांच्या प्रतिक्रियेला राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी दुजोरा दिला आहे. मात्र मंत्री आव्हाड यांच्या नेतृत्वाखालीच या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश झाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भगवान टावरे यांनी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद होऊ नये यासाठी खुद्द  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांना पक्षप्रवेशासाठी नकार दिला होता. मात्र सर्व नगरसेवकांनी एकाकी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.  दरम्यान, मनपात राष्ट्रवादीचे संख्याबळ नसतांनाही काँग्रेसच्या 16 नगरसेवकांनी राष्ट्रवादीशी घरोबा केल्याने राष्ट्रवादीची शहरातील ताकद वाढली आहे. विशेष म्हणजे महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी कोणार्क विकास व भाजपशी हात मिळवणी केल्याने अवघ्या 4 नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीकडे महापौर पद आले आहे. त्यामुळे एकूण 90 नगरसेवक संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेत काँग्रेसचे एकहाती 47 नगरसेवक असतांना अवघ्या चार नगरसेवक असलेल्या कोणार्ककडे महापौर पद गेल्याने काँग्रेस नेतृत्वाबरोबरच काँग्रेसच्या 18 नगरसेवकांवर निलंबनाची टांगती तालावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.