पुढच्या वर्षीपासून हातात येणार कमी पगार

Share This News

कोरोना आणि लॉकडाउनमुळे आधीच आर्थिक चणचणीचा सामना करत असलेल्या नोकरदार वर्गाची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी एप्रिलपासून देशात नवीन वेतन नियम लागू होणार आहे. या नव्या नियमामुळे फक्त प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी बरोबरच हातात येणार्‍या पगारावरतीही परिणाम होणार आहे. केंद्र सरकारने मागील वर्षी संसदेत वेज कोड विधेयक मंजूर केले होते. ते आता पुढील वर्षीपासून लागू होणार आहे.
केंद्र सरकारने नवीन वेज कोड विधेयक २0१९ मध्ये मांडले होते. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर कायदा अस्तित्वात आला असून, त्यातील नियम एप्रिल २0२१ पासून म्हणजे पुढील वर्षीपासून लागू होणार आहेत. याचा परिणाम हातात येणार्‍या पगारावर होणार आहे.
पुढील आर्थिक वर्षापासून वेतनाची नवीन व्याख्या लागू होणार आहे. यात खासगी क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचाही पगार निश्‍चित केला जाणार आहे. नव्या नियमानुसार कर्मचार्‍याला दिले जाणारे भत्ते एकूण पगाराच्या ५0 टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही. म्हणजेच एप्रिल २0२१ पासून एकून पगारात मूळ पगार हिस्सा ५0 टक्के वा त्यापेक्षा अधिक द्यावा लागणार आहे. या नव्या नियमामुळे वेतन रचनेत मोठे बदल होणार आहेत.
या नव्या नियमाचा फटका जास्त पगार असणार्‍या कर्मचार्‍यांना बसू शकतो. कारण नव्या नियमामुळे भत्त्यांची रक्कम कमी होणार आहे. जास्त पगार असणार्‍या कर्मचार्‍यांच्या पगारात अधिक भाग भत्त्यांचाच असतो. त्याचबरोबर पीएफ आणि ग्रॅच्युटी वाढणार असल्याने कंपन्यांकडून हा आर्थिक भारही कर्मचार्‍यांवरच टाकला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हातात येणारा पगार कमी होण्याचा अंदाज अर्थ विेषकांकडून व्यक्त केला जात आहे.
कामगारांच्या वेतनासंदर्भात किमान वेतन कायदा-१९४८, वेतन वाटप कायदा-१९३६, बोनस वाटप कायदा-१९६५ व समान मोबदला कायदा-१९७६ असे चार कायदे अस्तित्वात आहेत.
या चारही कायद्यांचे स्वतंत्र अस्तित्व संपून ते नव्या वेतन संहितेमध्ये एकत्रित करण्यात आले आहेत. सध्या प्रत्येक राज्यात वेगवेगळे किमान वेतन दिले जाते. कामगारांच्या वेतनाच्या केंद्र व राज्यांच्या व्याख्याही वेगवेगळ्या आहेत. नव्या कायद्यामुळे कामगारांच्या किमान वेतनाची देशभर एकसमान व्याख्या अस्तित्वात येईल.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.