भरधाव ट्रकने पादचाऱ्याला उडविले A pickup truck blew up a pedestrian

धामणा : पायी राेड ओलांडत असलेल्या व्यक्तीला भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील १४ मैल-कळमेश्वर वळण मार्गावर शनिवारी (दि. २) सकाळी ११ वाजता घडली. प्रमोद मनोहर पन्नासे (५५, रा. नीलडोह-पन्नासे, ता. हिंगणा) असे मृताचे नाव आहे. ते १४ मैल येथील लाॅजिस्टिक पार्कमध्ये कामगार म्हणून काम करायचे. ते वळण मार्गावर पायी राेड ओलांडत असताना वेगात आलेल्या एमपी-२२/८५११ या क्रमांकाच्या ट्रकने त्यांना धडक दिली. पाय व कमरेवरून चाक गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात हाेताच चालकाने जवळच्या पेट्रोल पंपजवळ ट्रक उभा करून पळ काढला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. ते घरातील एकमेक कमावते हाेते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर आर्थिक संकट काेसळले आहे. हे ठिकाण अपघातप्रवण आहे. या ठिकाणी महामार्गाच्या दाेन्ही बाजूला माेठ्या प्रमाणात ट्रक व ऑटाे उभे केले जात असून, दुकाने थाटलेली आहेत. त्यामुळे समाेरून येणारी वाहने दिसत नसल्याने येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार दिलीप सपाटे व मन्नान नाैरंगाबादे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.