अवनी वाघिणीला ठार मारण्याचा कट रचला होता!; धक्कादायक प्रतिज्ञापत्र

नागपूर:पंढरकवडा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टी-१अवनी या वाघिणीला ठार मारण्याचा कट दोन पशूवैद्यकांचा होता, असे प्रतिज्ञापत्र प्रसिद्ध शिकारी  शफत अली खान वय ६३, रा. हैदराबाद आणि त्यांचा मुलगा असगर अली खान (वय ४०) यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहे.

या पशुवैद्यकांनी महाराजबागमधील एका वाघिणीचे मूत्र अवनी वाघिणीच्या क्षेत्रात फवारले. यामुळे ती स्वत:ला व शावकांना असुरक्षित समजू लागली. तेव्हापासून ती एकाच रस्त्यावर दबा धरून राहायची. आम्ही तिला बेशुद्ध करण्यासाठी डॉट मारला. पण, डॉट मारल्यानंतर वाघीण बेशुद्ध व्हायला किमान १० ते १५ मिनिटे लागतात. या दरम्यान ती अधिकच चवताळली व तिने पथकावर हल्ला केला. आम्ही खुल्या जिप्सीत होतो. चालकही घाबरल्याने वाहन रस्त्याखाली उतरले. अवनी ५ ते ७ मीटर अंतरावर असताना स्वत:च्या व पथकातील इतरांचा जीव वाचवण्यासाठी तिला ठार करावे लागले,’ असे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.अवनी वाघिणीने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन परिक्षेत्रांतर्गत १३ जणांचा बळी घेतला. त्यानंतर तिला नरभक्षक ठरवून ठार करण्याचे आदेश वनविभागाने दिले. तिला ठार मारण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयात अनेकदा आव्हान देण्यात आले. पण, उच्च न्यायालयाने ती वाघीण नरभक्षक असल्यावर शिक्कामोर्तब करून वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचे प्रयत्न करावेत. त्यात अपयश आल्यास पुढील मनुष्यहानी टाळण्यासाठी ठार मारावे असे आदेश दिले. तिच्या दोन छाव्यांना बेशुद्ध करून पकडावे व बचाव केंद्रामध्ये पाठवावे असेही आदेशात नमूक केले होते. त्यानंतर २ नोव्हेंबर २०१८ रोजी अवनीला ठार मारण्यात आले.रम्यान, अवनीच्या दोन बछड्यांना पकडून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे; खासगी शिकारी शफत अली खान, असगर अली खान, मुखबिर शेख व पशुवैद्यक अधिकारी डॉ. बी. एम. कडू यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका वन्यजीव प्रेमी सरिता सुब्रम्हण्यम यांनी दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान आता शिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सदर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. शिकारींतर्फे अॅड. आदिल मिर्झा, याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. श्रीरंग भांडारकर आणि वनविभागातर्फे अॅड. कार्तिक शुकूल यांनी बाजू मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.