आकाशात दिसला अद्भुत नजारा; सूर्याभोवती चक्क कंकणाकृती इंद्रधनुष्य

सिंधुदुर्ग, 10 ऑगस्ट : श्रावण महिना म्हणजे उन-पावसाचा खेळ. अशावेळी आकाशात इंद्रधनुष्य दिसते. साधारण अर्धवर्तुळकार स्वरूपाचे हे इंद्रधनुष्य असते. पण आज सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ले, कुडाळ भागातल्या लोकांना सूर्याभोवती कंकणाकृती इंद्रधनुष्य पाहायला मिळाले. दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमाराला हा अद्भुत नजारा अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला.

हिंदू धर्मातील पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरु झाला आहे. श्रावणात दिसते ते निसर्गाचे विलोभनीय रूप. ऊन – पावसाचा खेळ. या खेळात मध्येच दर्शन घडत ते सप्तरंगी इंद्रधनुचे. आज सिंधुदुर्गवासियांना असेच काहीसे निसर्गाचे सुंदर दर्शन घडले. काहीसे ढगाळ वातावरण, लख्ख तळपणारा सूर्य आणि सूर्याच्या भोवताली तयार झालेले इंद्रधनुष्य सदृश्य कंकणाकृती रिंगण. हा विलोभनीय नजारा अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.

आकाशात सूर्याच्या भोवती इंद्रधनुष्य सदृश्य कंकणाकृती रिंगण तयार झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागात हे दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले. याबाबत भूगोल विषयाचे प्राध्यापक शिवराम ठाकूर यांना विचारले असता ते म्हणाले, हा इंद्रधनुष्याचा प्रकार असून ढगातून झालेल्या बाष्पाचे हे परावर्तन आहे. इतर वेळी अर्धवर्तुळाकार दिसणारे इंद्रधनुष्य यावेळी कंकणाकृती रुपात तयार झाले असावे. पण या दृशाने ऐन श्रावणात एक विलोभनीय दृश्य अनुभवायला मिळाले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.