नागपुर: अनैतिक संबंधातून तरुणाचे अपहरण

नागपूर : जागनाथ बुधवारीतील एका व्यापाऱ्याच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाचे एका अल्पवयीन मुलासह तिघांनी अपहरण केले. त्याला धडा शिकविण्याचा आरोपींचा हेतू होता. मात्र, गस्तीवरील बिट मार्शल दिसल्याने अपहृत तरुण आरोपींच्या दुचाकीवरून उडी घेऊन पळाल्याने मोठा गुन्हा टळला. मंगळवारी रात्री ९.१५ वाजता ही घटना घडली. पोलीस चाैकशीत हे अपहरणकांड अनैतिक संबंधातून घडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी १५ वर्षीय मुलासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

प्रदीप होमेश्वर नंदेश्वर (वय २५) असे तरुणाचे नाव असून तो विणकर कॉलनीत राहतो. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिलीप सोेरेबाजी आसुदानी (वय ५५) यांच्या शिवम एन्टरप्रायजेसमध्ये प्रदीप काम करतो. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याचे एका विवाहित महिलेशी संबंध आहेत. त्या संबंधाचा बोभाटा झाल्यामुळे महिलेच्या कुटुंबात वादविवाद वाढला. परिणामी तिच्या अल्पवयीन मुलासह सर्वांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर, नेहमीप्रमाणे प्रदीप मंगळवारी रात्री दुकानात हजर असताना एका मोटरसायकलवर महिलेच्या नात्यातील अल्पवयीन आरोपीसह तिघे तेथे आले. त्यांनी प्रदीपला आवाज देऊन आपल्या जवळ बोलविले आणि नंतर त्याला शिवीगाळ करीत जबरदस्तीने आपल्या मोटरसायकलवर बसवून पळवून नेले. प्रदीपला धडा शिकविण्याचा त्यांचा हेतू होता.

त्यामुळे त्यांनी प्रदीपला मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. प्रदीपला ते इतवारीतून घेऊन जात असताना रस्त्यात दोन पोलीस कर्मचारी प्रदीपला दिसले. त्यामुळे आरोपींनी दुचाकीचा वेग कमी केला. ही संधी साधून प्रदीपने दुचाकीखाली उडी मारून पळ काढला. तर तो पळत असल्याने संशय आल्यामुळे बिट मार्शलनेही त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. प्रकरण नाजूक असल्याने प्रदीप भलतीच कथा पोलिसांना सांगू लागला. काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता, त्यामुळे वादविवाद झाल्याने त्या तरुणांनी आपल्याला जबरदस्तीने गाडीवर बसवल्याचे सांगितले. दरम्यान, त्याने आपल्या प्रेमिकेला फोन करून आपल्या घरच्यांना सुरक्षित असल्याचा निरोप द्यायला सांगितले. प्रदीप तक्रार द्यायला तयार नसल्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडून तसे लिहून घेतले.

संशयाची सुई महिलेवर
प्रदीपने आपल्या घरच्यांना अथवा मित्रांना फोन करून सुखरूप असल्याचे सांगण्याऐवजी प्रेयसीला फोन केल्याची बाब पोलिसांना खटकली. त्या महिलेवर संशयाची सुई वळल्याने पोलिसांनी लगेच प्रदीपला खाक्या दाखवला. त्यानंतर महिलेशी अनैतिक संबंध असल्याने तिच्या नात्यातील मुलाने अपहरण केल्याचा घटनाक्रम पुढे आला. त्यानंतर ठाणेदार जयेश भंडारकर यांनी आसुदानी यांची तक्रार नोंदवून घेत अपहरणाचा गुन्हा दाखल केला. दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.