हक्कानी गटाच्या गोळीबारात अब्दुल बरादर जखमी

काबूल
अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापनेचा पेच अजूनही सुटला नाही. सरकार स्थापनेच्या मु्द्यावरून तालिबानमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला असल्याचे वृत्त आहे. तालिबान आणि हक्कानी नेटवर्कच्या नेत्यांमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. अनस हक्कानी व खलील हक्कानी यांची मुल्ला बरादर आणि मुल्ला याकूब यांच्यासोबत संघर्ष झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. या संघर्षा दरम्यान हक्कानी गटाकडून झालेल्या गोळीबारात मुल्ला बरादर जखमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
हक्कानी नेटवर्क सरकारमध्ये मोठी जबाबदारी मागितली आहे. त्यांना संरक्षण खातेदेखील हवे आहे. तर, तालिबानने हक्कानी नेटवर्कच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिला. या दरम्यान हक्कानी आणि बरादर गटामध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त पंजशीर ऑब्र्जवर आणि पंजशीर बंडखोरांच्या एनएफआरने दिले आहे. या गोळीबारात बरादर जखमी झाला आहे. मात्र, या गोळीबाराच्या दाव्याला अद्याप कोणीही दुजोरा दिला नाही. बरादरवर पाकिस्तानमध्ये उपचार सुरू असल्याने अफगाणिस्तानमधील सरकार स्थापन करणे टाळले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. पाकिस्तानकडून हक्कानी नेटवर्कला झुकते माप दिले जात असल्याची चर्चा आहे. तालिबानच्या सरकारमध्ये हक्कानी नेटवर्कला महत्त्वाची जबाबदारी मिळावी असे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहेत. तालिबान सरकार स्थापन करण्यासाठी असलेले मतभेद दूर करण्यासाठी पाकिस्तान आयएसआय प्रमुखांनी अफगाणिस्तानचा दौरा केला असल्याचे म्हटले जात आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.