महानिर्मितीच्या ‘मिशन ऑक्सिजन’ मोहिमेला गती

Share This News

नागपूर ; महानिर्मिती व्यवस्थापनाने तातडीने ऑक्सिजन पुरवठय़ासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून अंमलबजावणीदेखील सुरू केली आहे. त्यानुसार सध्या महानिर्मितीच्या खापरखेडा, कोराडी, पारस व परळी या वीज केंद्रामधील ओझोनायझेशन प्लांटमधून त्या-त्या परिसरातील गंभीर कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजनचा पूरक पुरवठा करण्यासाठी अतिशय गतिमान पावले उचलली जात आहेत. या वीज केंद्रांद्वारे वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा साध्य होणार आहे.
औष्णिक वीज केंद्रात वापरल्या जाणार्‍या पाण्यात शेवाळ-सूक्ष्मजंतू होऊ नयेत, यासाठी त्या पाण्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी ओझोनायझेशन प्लांट स्थापित केलेले असतात. वीजनिर्मितीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन अशा प्लांटमधून काही अतिरिक्त यंत्रणा उभारून किमान ९५ टक्के शुद्धता राखून पूरक वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते. याचा साधकबाधक अभ्यास करून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्या नेतृत्वाखाली महानिर्मितीची संपूर्ण यंत्रणा गतिमानतेने कामाला लागली आहे. पहिल्या टप्प्यात महानिर्मितीच्या नवीन परळी वीज केंद्राने अवघ्या काही दिवसांत अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाला प्रतिदिन २८८ जम्बो सिलेंडर क्षमतेचा व ९५.२ टक्के शुद्धतेचा ऑक्सिजन प्लांट उभारला. हा प्लांट २७ एप्रिल रोजी कार्यान्वित केल्याने परळी-बीड परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. तसेच आता प्रति तास ८४ घनमीटर क्षमतेचा अशाच प्रकारचा प्लांट परभणी जिल्हा परिषद कोविड रुग्णालय येथे देखील उभारला जात असून, तो पुढील आठवड्यात कार्यान्वित होणार आहे. मराठवाड्यात महानिर्मितीचे फार मोठे काम सुरू झाले आहे. पहिला टप्पा तातडीने मार्गी लावल्यानंतर, दुसर्‍या टप्प्यात खापरखेडा व पारस केंद्रातील सध्यस्थितीतील ओझोनायझेशन प्लांटनजीकच्या शासकीय रुग्णालय परिसरात स्थलांतरित करून तिथून ऑक्सिजन निर्मिती साध्य केली जाणार आहे. खापरखेडा कें द्रातून प्रति तास ४२ घनमीटर क्षमतेने आणि पारस केंद्राद्वारे प्रति तास ५0 घनमीटर या क्षमतेने ऑक्सिजन पुरवठा साध्य केला जाणार आहे. तसेच कोराडी (नागपूर), पारस (अकोला) व परळी (बीड) येथे वीज केंद्र परिसरातच रिफिलिंग/बॉटलींग प्लांट उभारून ऑक्सिजन सिलेंडर निर्मिती साध्य करणे हा नियोजनाचा तिसरा टप्पा असणार आहे. याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त आवश्यक ते कॉम्प्रेसर्स, फिल्टर्स व इतर अत्यावश्यक यंत्रसामुग्री तातडीने विदेशातून आयात/देशांतर्गत उपलब्ध करून हा टप्पा साकार केला जाणार आहे. कोराडी वीज केंद्राद्वारे दररोज तब्बल १,00२ जम्बो सिलेंडर्स, पारस केंद्रारे प्रतिदिन १२८ सिलेंडर्स, परळी २१६ सिलेंडर्सची ऑक्सिजन निर्मिती करण्यात येईल. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन शासन निर्देशानुसार त्यासाठीच्या पूर्वतयारीचा हा भाग समजून महानिर्मितीने हा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.