प्राणघातक प्रवास सुरुच…

वैतरणा रेल्वेपुलावर आणखी एकाचा अपघाती मृत्यू; पर्यायी मार्गाबाबत प्रशासकीय उदासीनता कायम

पालघर : वैतरणा नदीवरील रेल्वे पुलावरील रेल्वेच्या धक्क्याने होणाऱ्या अपघाताची मालिका सुरू असून गुरुवारी आणखी एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे.   पूल ओलांडून घर गाठण्याच्या प्रयत्नात रेल्वेगाडीचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. गेल्या वर्षभरात आठ ते दहा जणांचा बळी गेला आहे. तरीही येथे पर्यायी मार्गाबाबत प्रशासकीय उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे परिसराती ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

वैतरणा नदीवरील रेल्वे पुलावर गाडी आल्यास आश्रय घेण्यासाठी काही फलाट (पिंजरे) बनविण्यात आले आहेत. ते  सरासरी २०० ते ३०० फूट लांबीवर आहेत.  मात्र त्या फलाटावर पोहोचण्यासाठी रूळ ओलांडून जाणे हे गरजेचे असते. तेदेखील तितकेच धोकादायक आहे, असे परिसरातील गावातील ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. त्यामुळे त्याचा फारसा होत नाही.

वाढीव गावाला सफाळे किंवा लगतच्या भागातून उड्डाणपूल उभारून हे बेट जोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र लोकसंख्या व अशा उड्डाणपुलासाठी लागणाऱ्या खर्चाचा विचार करता सद्य:स्थितीत हा पर्याय शक्य नसल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त झाल्याने ही कल्पना बारगळली आहे. एकीकडे पाणजू बेट व अर्नाळा येथील बेटांवर राहणाऱ्या रहिवाशांसाठी प्रशासनाने अनेक सुखसोयी उपलब्ध करून दिल्या असताना पालघर व वसई तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वाढीव बेटावरील नागरिक दररोज मरणयातनांना सामोरे जाताना दिसून येत आहेत.

का होतात अपघात?

सफाळे ते विरार दरम्यानचा रेल्वेचा वळणमार्ग  आहे. पूर्वी विरार किंवा सफाळा येथून गाडी निघाल्यानंतर  गाडी  दिसून येत असे त्यामुळे   अंदाज घेणे शक्य होते. मात्र सद्य:स्थितीत रुळाजवळ झाडे वाढल्याने गाडी येताना दिसत नाही. शिवाय पूर्वीच्या काळी गाड्या  ठरावीक वेळेत येत असल्याने स्थानिकांना  त्याची  माहिती असे. आता प्रवासी गाड्यांची संख्या काही पटींनी वाढली आहे व त्याचबरोबरीने मालगाड्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. दर पाच-सात मिनिटांनी गाड्या पुलावरून धावत असतात. २१ गाळ्याचा पुलाच्या एका बाजूने गाडी आल्याची चाहूल लागल्यास पूल  ओलांडणाऱ्या  नागरिकाला बाजूच्या रुळावरून प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. अशा परिस्थितीत गाडी जवळ येताच पुलाच्या हालचालीमुळे होणारा आवाज प्रचंड होत असल्याने  तसेच त्यामुळे लगतच्या रुळा करून  गाडी आल्यास त्याचा अंदाज बांधणे कठीण जाते.  सोबतच्या  लोकांनी आरडाओरड करून सावध करण्याच्या सूचना जरी केल्या तरी त्या ऐकू येत नाहीत. त्यामुळे रुळ ओलांडताना पुलावरून सामोरासमोरून गाड्या आल्यास असे अपघात होतात.

पादचारी पूल, जेटीचे काम अपूर्ण

पुलाच्या बाजूला  पादचारी पूल उभारण्यासाठीची मागणी रेटून धरल्यानंतर या पुलाचे काम सुरू करण्यात आले. मात्र तेही काम  अर्धवट  स्थितीत आहे. त्यामुळे अजूनही ग्रामस्थांना  रेल्वे रुळावरून पूल ओलांडणे भाग पडत आहे. गेल्या वर्षी असे अपघात वारंवार झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने वाढीव ते वैतरणा दरम्यान (तर) बोट उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. त्या अनुषंगाने नदी पात्राच्या दोन्ही बाजूला जेटी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात  आहे. मात्र वाढीव गावाच्या बाजूला असलेल्या खारलाइन बंधारा ते गावापर्यंत सुमारे अडीचशे-तीनशे मीटरच्या रस्त्याचे काम अजूनही हाती घेतले नसल्याने त्या जेटीवर प्रवास करणे शक्य होत नाही.

वाढीव ग्रामस्थाला रेल्वेची धडक

पालघर/वसई : वैतरणा-वाढीव येथे राहणाऱ्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी अजूनही कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने येथील नागरिकांना रेल्वे पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास रेल्वे गाडीची धडक लागून  चंदू विष्णू तरे  (३४) या  तरुणाचा मृत्यू झाला. विरार येथून कामावरुन घरी परतत असताना  पश्चिाम रेल्वेवरील वैतरणा स्थानकातून वाढीव गावाकडे वैतरणा नदीवरील पूल क्रमांक ९२ वरून चालत असताना या वेळी दोन्ही रेल्वे रुळांवरून गाड्या आल्या आणि एका गाडीची धडक बसून त्याचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी त्याचा  मृतदेह घरी नेल्यानंतर रेल्वेने   शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पुन्हा   विरार येथे नेण्यास सूचित केले. सर्व सोपस्कार झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  काही वर्षांपूर्वी चंदू तरे यांच्या वडिलांचादेखील अशाच प्रकारे अपघाती मृत्यू झाला होता.या पुलावर गेल्या दोन वर्षांत आठ ते दहा नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.  तरीसुद्धा वाढीव ग्रामस्थांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे व त्याबाबत उपाययोजना आखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.