यवतमाळातील ‘हनी ट्रॅप’प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी

यवतमाळ : महिला असल्याची बतावणी करून दिल्लीच्या डॉक्टरला यवतमाळातून तब्बल दोन कोटी रुपयांनी गंडा घालण्यात आल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. या ‘हनी ट्रॅप’प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
संदेश अनिल मानकर (रा. अरुणोदय सोसायटी, यवतमाळ) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. दिल्ली येथील रजत रतीशकुमार मोयल (४४) या डॉक्टरला सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकाने गंडविले. त्यासाठी त्याने अनन्नया सिंग ओबेराय (रा. यवतमाळ) असे महिलेचे नाव सांगितले होते. दुबईला लहान बहिणीचे अपरहण झाले आहे, तिला वाचवायचे आहे, दोन कोटीची आवश्यकता आहे, असे खोटे सांगून रक्कम मिळविली होती. त्यानंतर चार लाख आणि तीन लाख २० हजार रुपये घेतले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच डॉक्टरने यवतमाळ गाठून अवधूतवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करीत युवकाला अटक केली. त्याच्या किरायाच्या घरातून एक कोटी ७२ लाख सात हजार रुपये रोख, चार लाखांचे सोन्याचे दागिने, चार मोबाइल असा एकूण एक कोटी ७८ लाख सहा हजार १९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान रविवारी (५ सप्टेंबर) त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत त्याच्याकडून या प्रकरणासह अन्य फसवणुकीच्या घटनांचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.