धुळे : कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करा – कर्मचारी संघटना.

Share This News

धुळे,०६ नोव्हेंबर खासगीकरण, कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करावे, समान काम समान वेतनाचा नियम लागू करावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह विविध मागण्यांसाठी कामगार कर्मचारी संघटनेतर्फे २६ नोव्हेंबरला संप केला जाणार आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त समितीतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हाधिकरी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
 निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाने शेतकरी, कामगार, कर्मचारीविरोधी धोरणाचा सपाटा लावला आहे. त्यामुळे शेतकरी व कामगार अडचणीत आले आहेत. कामगार, शेतकर्‍यांसाठी शासनाने पोषक वातावरण निर्माण करावे, तसेच भांडवल धार्जिणे धोरण थांबवणे आवश्यक आहे. मात्र, शासन श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, कामगार, कर्मचारी, शिक्षकांना देशाधडीला लावण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. शासनाने आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना सहा महिने ७ हजार ५०० रुपये अर्थसाहाय्य व सहा महिन्यांसाठी १० किलो धान्य द्यावे, मनरेगाअंतर्गत ६०० रुपये रोजाने २०० दिवस काम द्यावे, शहरी भागासाठी ही योजना लागू करावी, बेरोजगारीवर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्या, कोविड कालावधीत सेवा देणार्‍या सर्व घटकांना आवश्यक सुरक्षा साधने द्यावी, अशी मागणी करण्यात आली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.