तालिबान्यांच्याविरोधात अफगाण महिला पुन्हा रस्त्यावर

काबूल
अफगाणिस्तानमध्ये अजून तालिबानचे सरकार अस्तित्वात आलेले नाही. पण त्याआधीच अफगाण लोकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसतोय. त्यातही अफगाण महिला तालिबान्यांच्याविरोधात रस्त्यावर पुन्हा पुन्हा उतरतायत. त्यांना उत्तर म्हणून तालिबानी बंदुकीचा आधार घेतायत. आजही राजधानी काबूलमध्ये तालिबानच्याविरोधात एक मोठा मोर्चा निघाला. ह्या मोर्चात महिलांचे प्रमाण मोठे होते. मोर्चात सहभागी झालेल्या अफगाण जनतेने तालिबान मुर्दाबादचे नारे दिले.
तालिबानने पंजशीरवर कब्जा केल्याची घोषणा केली. पण अजूनही अहमद मसूद, अमरुल्ला सालेह यांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. उलट नॉर्दन अलायन्स हे तालिबान्यांच्याविरोधात पाय रोवून लढत असल्याचे जाहीर केले. काबूलमध्ये जी तालिबानविरोधी रॅली काढण्यात आली त्यात शंभरपेक्षा जास्त जण सहभागी होते. ह्यात महिलांचे प्रमाण अधिक होते. आंदोलकांनी पाकिस्तानी राजदूताबाहेर जोरदार प्रदर्शन केले. पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये ढवळा ढवळ करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. याच वेळेस पाकिस्तानच्याविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली. पाकिस्तान मुर्दाबाद, पंजशीर जिंदार रहे असे नारेही यावेळेस लावले गेले. विशेष म्हणजे यावेळेस महिलांनी, पंजशीरमध्ये ना तालिबान, ना पाकिस्तान, कुणालाही घुसू दिले जाणार नसल्याची प्रतिज्ञा केली. रेजिस्टेंस फोर्स अमर रहेच्या घोषणाही दिल्या गेल्या.
अफगाणिस्तानचा कब्जा करुन तालिबानला आता वीस दिवसांपेक्षा जास्त काळ लोटतोय. सरकार बनवण्यावरुन तालिबान, हक्कानी नेटवर्क यांच्या तणावपूर्ण स्थिती आहे. परिणामी तालिबानच्याविरोधात अफगाणी जनतेतही रोष वाढताना दिसतोय. त्यातल्या त्यात पाकिस्तान आणि त्यांच्या गुप्तचर संस्थेने ज्याप्रमाणे अफगाणिस्तानच्या कारभारात, लोकांच्या आयुष्यात ढवळा ढवळ केलीय, त्यानेही अफगाण जनता संतप्त आहे. शेकडो अफगाण महिला आणि पुरुषांनी हातात तालिबान, पाकिस्तानविरोधी बॅनर घेऊन जोरदार प्रदर्शन केले. संतप्त झालेल्या अफगाण जनतेने आझादी, आझादीचे नारे लगावले. महिला ज्याप्रमाणे रस्त्यावर उतरतायत ते पहाता फक्त तालिबानच नाही तर पाकिस्तानलाही चांगलीच धडकी भरलीय.
अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानचे ड्रोन हल्ले
आयएकआय प्रमुख खास कमांडोजसह सध्या काबूलमध्ये आहे. त्याच्याच पाठिंब्यावर तालिबानने पंजशीरमध्ये अहमद मसूद आणि अमरुल्ला सालेहविरोधात मोर्चा उघडला. पण तालिबान तेवढय़ावरच थांबलेले नाही. पंजशीर व्हॅली हा अफगाणिस्तानचा भाग आहे आणि तिथे पाकिस्तानी लष्कराने ड्रोन हल्ले केल्याचे आता उघड झाले. म्हणजे तालिबाननं स्वत:च्याच भूभाग आणि जनतेवर दुसरा देश म्हणजेच पाकिस्तानला हल्ले करायला सांगितले किंवा तशी परवानगी दिलीय. त्याचाही रोष जनतेत दिसतोय. पण तालिबानला पाकिस्तानने कायम पाठिंबा दिलाय. गेल्या २0 वर्षांपासून पाकिस्ताननेच तालिबानला पोसले. तालिबान नेत्यांनीही अनेक वेळेस पाकिस्तान हे आमचे दुसरे घर असल्याचे म्हटलेा. त्यामुळे सरकारच्या स्थापना समारोहसाठी पाकिस्तानला विशेष निमंत्रण पाठवले गेले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.