तब्बल ४३ वर्षांनंतर चाळीस रुपये लुटल्याच्या आरोपातून आरोपी दोषमुक्त

नागपूर : चाकू दाखवून  चाळीस रुपये लुटल्याच्या  आरोपातून तब्बल ४३ वर्षांनंतर तीन व्यक्तींची निर्दोष सुटका सेशन कोर्टाने केली. भीमराव नितनवरे (रा.नागपूर), असे दोषमुक्त व्यक्तीचे नाव आहे. उर्वरित दोषमुक्त दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मोतीराम कोठाळे (रा. टाकळी सीम,  एमआयडीसी), असे फिर्यादीचे नाव आहे. आरोपी व फिर्यादी एकाच गावातील होते. दोषमुक्त आरोपी शिक्षेच्या भीतीने १६ वर्षे फरार होता. त्यामुळे या खटल्याचा निकाल लागू शकला नाही. आरोपी मिळाल्यानंतर खटला सुरू झाला आणि आरोपीविरुद्ध कलम ३९८ अन्वये गुन्हा सिद्ध होत नसल्यामुळे आरोपी कोर्टात दोषमुक्त झाला.  
 फिर्यादीने १४ जानेवारी १९७८ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, दूध वाटप करून घराकडे जात असताना एअरपोर्ट गेटजवळ आरोपींनी त्यांना रस्त्यात थांबवून चाकूच्या धाकावर ४० रुपये लुटले. पोलिसांनी विविध कलमांन्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. नंतर पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोर्टाने कलम ३९४ मध्ये ‘चार्ज फ्रेम’ होत नसल्यामुळे कलम ३९८ मध्ये ‘चार्ज फ्रेम’  केले. खटला सेशन कोर्टात वर्ग केला. सेशन कोर्टाने तिघांविरुद्ध समन्स काढला. यादरम्यान काही साक्षीदारांचा मृत्यू झाला. जिवंत साक्षीदारांच्या घराचा पत्ता मिळाला नाही. तसेच सरकारी वकिलांनी कोर्टात आरोपीविरुद्ध पुरावा सादर केला नाही. कलम ३९८ अन्वये  गुन्हा सिद्ध न झाल्यामुळे कोर्टाने आरोपीला दोषमुक्त केले

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.