बर्ड फ्लू बाबतचा अहवाल नागपूरनंतर भोपाळ येथील प्रयोगशाळेनेही पॉझिटिव्ह

गडचिरोली : गडचिरोली शहरातील फुले वाॅर्डात गेल्या आठवड्यात आढळलेल्या ३ मृत कोंबड्यांचा ‘बर्ड फ्लू’बाबतचा अहवाल नागपूरनंतर भोपाळ येथील प्रयोगशाळेनेही पॉझिटिव्ह दिला आहे. त्यामुळे शहरात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट करीत फुले वाॅर्डमधील एक किलोमीटरचा परिसर संसर्ग क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या भागातील कोंबड्यांसह सर्वच जिवंत पक्ष्यांना मारून त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. मृत कोंबड्यांचा ‘बर्ड फ्लू’बाबतचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. मागील काही दिवसांत राज्याच्या काही भागांत ‘बर्ड फ्लू’ने कोंबड्या दगावल्याचे आढळून आले. त्यानंतर गडचिरोली शहरातील फुले वाॅर्डातील कुक्कटपालन करणाऱ्या व्यावसायिकांच्या काही कोंबड्या मृत झाल्याचे आढळून आले. सदर मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. सदर अहवाल मंगळवारी सकारात्मक आला. त्यामुळे जिल्ह्यातील प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी फुले वाॅर्ड येथील संबंधित व्यावसायिकाच्या घराचा परिसर पक्ष्यांसाठी संसर्ग क्षेत्र म्हणून जाहीर केला. ज्या ठिकाणी सदर कोंबड्या मृत झाल्या त्या ठिकाणी केंद्रबिंदू धरून १ कि.मी. त्रिज्येचे संसर्ग क्षेत्र, तसेच १० कि.मी. त्रिज्येचे सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करून प्रतिबंधित करण्यात आले आहे. फुले वाॅर्डमधील संबंधित व्यावसायिकाच्या प्रक्षेत्रापासून १ ते १० कि.मी. त्रिज्येतील परिसरामधून कुक्कुट पक्ष्यांची बाहेर जाणारी वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन, अंडी, कुक्कुटखत यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे असले तरी १ कि.मी.चा बाधित परिसर वगळून १० कि.मी. क्षेत्रात निरोगी कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्री करण्यास मुभा राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.