कुलगुरू नियुक्तीचे सर्वाधिकार सरकार स्वत:कडे घेणार!

महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात केले जाणार बदल

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संघर्ष अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात मोठे बदल करण्यात येणार आहेत. कुलपती या नात्याने कुलगुरू निवडीचे सर्वाधिकार राज्यपाल यांना आहेत. मात्र हे अधिकार आता राज्य सरकार स्वत:कडे घेणार आहे.
केंद्राच्या धोरणाशी सुसंगत राज्याचा विद्यापीठ कायदा असावा म्हणून आॅक्टोबर २०२० मध्ये राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण शिक्षण विभागाने १४ सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृहात समितीची बैठक नुकतीच मुख्यमंत्र्यांबरोबर झाली. या बैठकीत कायद्यात करावयाच्या बदलांसंदर्भात चर्चा झाली. विद्यापीठांना एक ऐवजी दोन प्र-कुलगुरू असावेत, वित्त विभागाचा प्रमुख राज्य सरकारच्या सेवेतील अनुभवी अधिकारी असावा. तसेच कुलगुरू निवड समितीत राज्य शासनाचे आणखी दोन प्रतिनिधी समाविष्ट करण्यावर या बैठकीत विचार झाला. या समितीचा अहवाल उच्च व तंत्रशिक्षण विभागास एक महिन्यात प्राप्त होणे अपेक्षित आहे. समितीच्या अहवालातील शिफारशींवर उच्च व तंत्रशिक्षण विभाग निर्णय घेईल. त्यानंतर विधी व न्याय विभागाची संमती घेऊन सुधारणा विधेयक तयार केले जाईल. हे नवे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात सादर होईल.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.