खासगी दवाखान्यात बेडची संख्या वाढवायला तात्काळ परवानगी द्या : पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

Share This News

जिल्ह्यात कोविडचा संसर्ग वेगाने फैलावत असून आरोग्य यंत्रणावर प्रचंड ताण येत आहे. कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी व वाढीव बेडसाठी जिल्हयातील ज्या खासगी रुग्णालयांनी प्रशासनाकडे प्रस्ताव दिले आहेत त्या रुग्णालयांना तात्काळ परवानगी द्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात कोविड आढावा बैठकीत  पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कायदा व सुव्यवस्था, रेमडेसिवीरची, बेडची संख्या वाढविण्याबाबत आढावा बैठक घेतली. केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे या बैठकीत सहभाग घेतला.यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेशकुमार,जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.सुरुवातीला पालकमंत्र्यांनी पोलीस विभागाकडून कायदा व सुव्यवस्थेचा झोननिहाय आढावा घेतला. राज्य शासनाच्या नवीन निर्बधांची अंमलबजावणी करतानाच आवश्यक उद्योग व सेवेतील कामगारांना, तसेच लसीकरणासाठी घराबाहेर पडणाऱ्यांना नागरिकांची गैरसोय होणार नाही याची पोलीसांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. मात्र कोणतेही आवश्यक काम नसतांना विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे  संकेत त्यांनी दिले. तत्पूर्वी पालकमंत्री डॉ. राऊत यांनी जिल्हयातील प्रमुख औषध विक्रेते व उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे चर्चा केली. यामध्ये रुग्णांना शासकीय दरामध्येच रेमडिसीवर उपलब्ध करुन द्यावे. लोकांच्या जिविताचा प्रश्न असल्याने औषध विक्रेत्यांनी मानवीय भावनेतून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी झॉयडस, सिप्ला, हेड्रो, सनफार्मा, मायलन, मेट्रो मेडीकल एजन्सी या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. दरपत्रक जाहीर केल्यास पारदर्शकता येईल असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.