अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक रिंगणात अनेक दिग्गज उतरल्याने ही निवडणूक आता चुरशीची होणार आहे. सोमवारी (ता.6) उमदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून संचालकपदासाठी यशोमती ठाकूर नामांकन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. तसेच यापूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील नामांकन अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता दोन्ही मंत्री आमनेसामने येणार आहेत.
31 ऑगस्टपासून उमेदवारी अर्जांची प्रक्रिया सुरू झाली असून 3 सप्टेंबरपर्यंत 118 जणांनी उमेदवारी दाखल केली असून 302 अर्जांची उचल झालेली आहे. याचाच अर्थ सोमवारी सुद्धा 100 च्या आसपास उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. 4 ऑक्टोबरला होणार्‍या निवडणुकीसाठी सत्ताधार्‍यांसोबतच विरोधी पॅनेलने सुद्धा मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहे. 21 संचालकपदांसाठी 150 ते 200 उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता असून आता माघारीकडे लक्ष लागणार आहे. अद्याप कोणत्याही पॅनेलकडून उमेदवारांची घोषणा झालेली नसून प्रमुख उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. येत्या दोन दिवसांत पॅनेलची घोषणा होण्याची शक्यता आहे. आमदार बळवंत वानखेडे, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रकाश भारसाकळे, माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे. आता कोण मैदान सोडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मावळते अध्यक्ष बबलू देशमुख यांची घेराबंदी करण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. चांदूरबाजार सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या बबलू देशमुख यांच्या विरोधात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अर्ज भरला आहे, तर ओबीसी मतदारसंघातून सुद्धा देशमुख यांनी अर्ज दाखल केला असून त्यांच्याविरोधात संजय खोडके यांनी स्वतः ची उमेदवारी दाखल केली आहे. तसेच बबलू देशमुख यांच्यासोबत यशोमती ठाकुरांची एकजूट आहे.
सत्ताधारी आणि विरोधी अशा दोनच पॅनेलची सध्या चर्चा होत आहे. दोन्ही पॅनेलकडून उमेदवारी मिळेल या आशेवर अनेकांनी उमेदवारी दाखल करून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे, मात्र ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष किंवा ऐनवेळी स्थापन होणार्‍या तिसर्‍या आघाडीकडून संधी मिळते का?, याची चाचपणी अनेकांकडून केली जात आहे

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.