लाचखोरीचा आरोप असलेले अनिल देशमुख चौकशीसाठी सीबीआयपुढे झाले दाखल

मुंबईः खंडणीखोरीचा आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख बुधवारी सकाळी चौकशीसाठी सीबीआयपुढे दाखल झाले आहेत. सीबीआयचे पथक मुक्कामी असलेल्या डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये सध्या त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप केला आहे. या गंभीर प्रकरणाची प्राथमिक चौकशी न्यायालयाने सीबीआयला सोपविली आहे. सीबीआयने दोनच दिवसापूर्वी देशमुख यांना समन्स बजावले होते. त्यानुसार ते बुधवारी सकाळी डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये चौकशीसाठी दाखल झाले आहेत. सीबीआयने यापूर्वी परमबीर सिंह यांच्यासह निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, अड जयश्री पाटील आणि बारमालक महेश शेट्टी आदींचे बयाण नोंदवून घेतले आहे. याशिवाय सीबीआयने देशमुख यांचे स्विय सहायक कुंदन शिंदे, संजीव पलांडे यांचीही चौकशी केली आहे. सीबीआयला पंधरा दिवसात प्राथमिक चौकशीचे निष्कर्ष सादर करावयाचे आहेत.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.