अनिल देशमुखांनी आता चौकशीला सामोरे जायला हवे, फडणवीस यांचा सल्ला

नागपूरः माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता चौकशीला सामोरे गेले पाहिजे, असा सल्ला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राज्यातील महाविकास आघाडी ही गव्हर्नन्ससाठी नव्हे तर सत्तेचे लचके तोडण्यासाठी झाली असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
विरोधी पक्ष नेते फडणवीस हे नागपुरात बोलत होते. ईडीने देशमुख यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस काढल्याचे आपल्याला प्रसार माध्यमांतूनच कळले, असे सांगताना फडणवीस म्हणाले की, देशमुख यांनी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न केले आहेत. आता त्यांनी चौकशीला सामोरे गेले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
महविकास आघाडी चांगले सरकार देण्या नाही तर सत्तेचे लचके तोडण्यासाठी झाली आहे. प्रत्येक जण लचके तोडण्याचा प्रयत्न करत आहे. ते शक्य न झाल्यास एकमेकांचे लचके तोडण्यात येत असल्याची आघाडी सरकारची अवस्था आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आम्हाला सल्ला न देता सोबतच्या व आपल्या पक्षातील लोकांना पहिले शिकवावे व मग आम्हाला सांगावे, अशी कोपरखळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यावर हाणली. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी महिला करुणा शर्मा प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. तेथे जे काही घडले, त्यावरून तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची कल्पना येते. पिस्तूल मिळणे हे गंभीर असून यासंदर्भात कोणत्याही दबावाशिवाय चौकशी झाली पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.