अंजनगाव सुर्जीत ट्रान्सफार्मर बनविणाऱ्या कंपनीला आग; लाखोंचे नुकसान

अमरावती : जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील एमआयडीसी परिसरातील ट्रान्सफार्मर बनविणाऱ्या कंपनीला सोमवार, ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री आग लागली. या आगीत ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मध्यरात्री विजांचा गडगडाट होऊन मुसळधार पाऊससुद्धा बरसला. त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली, हे समजू शकले नाही.
प्राप्त माहितीनुसार एमआयडीसी परिसरात इम्रान खान रशीद खान यांची विजेचे ट्रान्सफार्मर बनविण्याची हिंदूस्थान पॉवर सप्लाय कंपनी आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजता सर्व कामगार काम आटोपल्यावर कंपनी बंद करून घरी गेले. दरम्यान, मध्यरात्री अचानक टिनाचे शेड असलेल्या कंपनीला आग लागली. धुराचे लोळ दिसून आल्यावर काही नागरिकांनी मालक इम्रान खान यांना माहिती दिली. इम्रान खान तातडीने कंपनीत पोहोचले. यावेळी भीषण आग लागल्याचे पाहून नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून आगीवर  नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत या आगीत यात ४५ तयार ट्रान्सफार्मर  व सुमारे ८० ट्रान्सफार्मरचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी  सापडले. त्यात जवळपास ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा  अंदाज वर्तविण्यात आला आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.