पेडणेकर, जाधव, कांबळे, धोत्रे, पाटील हे मराठी नाहीत का? पडळकरांचा संजय राऊतांना सवाल

मुंबई : संजय राऊतांना बेळगावमध्ये निवडून आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेशमा पाटील असे अनेकजण मराठी माणसे वाटत नाहीत का? कारण काय तर ते म्हणे ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत म्हणून ते मराठीच राहिले नाहीत ? मराठी माणसाचा राऊत यांना एवढा आकस का? असा सवाल भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्राच्या मतदाराने युतीला बहुमत दिले. पण नंतर तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. पाकिस्तानचे व कलम 370 चे गोडवे गाणार्‍यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खाताय. हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदूस्थानाला समजले आहे, अशी टीका यावेळी त्यांनी केली.
‘दिल्लीतल्या मॅडमला व युवराजांना सत्तेसाठी खुष करण्यासाठी तुम्ही वारकर्‍यांना गुन्हेगार ठरवून मराठीजणांचा सन्मान असलेल्या वारीवर दंडुकेशाहीचा वापर केला. वारकर्‍यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरविला. त्यांचाच शाप व तळतळाट तुम्हाला आता इथून पुढेही भोगावा लागणार आहे’, असे पडळकर म्हणाले आहेत. किंबहूना आपला पराभव म्हणजे बेळगावच्या मराठी माणसाने तुमच्या १५ कोटीच्या ‘पेंग्विन’ विकासाचे मॉडल नाकारले आहे, असा टोला यावेळी त्यांनी लगावला. हिंदू सण आले की तुम्ही निर्बंध लादता व इतरांच्या सणासुदीला सत्तेसाठी मुजरे करता. अशा तुमच्या पाखंडी वृत्तीचा बुरखा फाटला आहे आणि तुमचा खरा चेहरा प्रत्येक हिंदूच्या पुढे उजळून आला आहे, अशी टीकाही पडळकर यांनी केली.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.