अर्णव गोस्वामींनी TRP वाढविण्यासाठी लाखो रुपयांची लाच दिली; मुंबई पोलिसांचा कोर्टात गौप्यस्फोट

मुंबई टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात अहवाल सादर केला. रिपब्लिक टेलिव्हीजन नेटवर्कचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (टीआरपी) वाढविण्यासाठी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलचे (बीएआरसी) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना लाखो रुपयांची लाच दिल्याचा गौप्यस्फोट मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात केला आहे.  मुंबई पोलिसांच्या या अहवालामुळे आता अर्णव गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. “पार्थो दासगुप्ता ‘बीएआरसी’चे सीईओ असतानाच्या काळात अर्णव गोस्वामी आणि इतर आरोपींनी रिपब्लिक भारत हिंदी वृत्तवाहिनी आणि रिपब्लिक टीव्ही इंग्रजी वृत्तवाहिनीच्या टीआरपीत चुकीच्या पद्धतीनं वाढ करण्यात आली. टीआरपी वाढवून दाखविण्यासाठी गोस्वामी यांनी दासगुप्ता यांना अनेकदा लाखो रुपयांची लाच दिली, असं चौकशीत समोर आलं आहे”, अशी माहिती मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिली. पार्थो दासगुप्ता यांना मुंबई पोलिसांनी गेल्याच आठवड्यात अटक केली असून त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्यात पहिल्यांदाच अर्णव गोस्वामी यांचं नाव थेट कोर्टात उघडपणे घेतलं आहे. दरम्यान, गोस्वामी यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.  पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात मात्र आरोपी म्हणून अर्णव गोस्वामी यांचं नाव नमूद केलेलं नाही.  पोलिसांच्या माहितीनुसार, पार्थो दासगुप्ता यांनी रिपब्लिककडून मिळालेल्या पैशातून दागदागिने आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी केल्या आहेत. या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये १ लाख रुपये किमतीचं घड्याळ आणि इमिटेशन ज्वेलरीसह २.२२ लाख किमतीचे काही मौल्यवान खड्यांचा समावेश आहे.  टीआरपी घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वझे यांनी इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, दासगुप्ता यांनी चौकशीदरम्यान अर्णव गोस्वामी यांना मुंबईतील विविध हॉटेलांमध्ये तीनवेळा भेटल्याची कबुली दिली आहे. या भेटीदरम्यान लाखभर रुपये रोख स्वरुपात गोस्वामींनी दिले आहेत. यात एकदा यूएस डॉलरचा देखील समावेश आहे.

गोस्वामी आणि दासगुप्ता यांनी याआधी ‘टाइम्स नाऊव्ह’मध्ये एकत्र काम केलं आहे. पार्थो दासगुप्ता यांच्यासह ‘बीएआरसी’चे माजी सीओओ रोमिल रामगढिया यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. यांच्यासोबतच बार्कच्या आणखी काही माजी कर्मचाऱ्यांचा टीआरपी घोटाळ्यात हात असल्याचा पोलिसांना संशय आहे.  ‘बीएआरसी’च्या सध्याच्या व्यवस्थापनाने थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्टनुसार तपास केल्यानंतर काही नावं पुढे आली. त्यानुसार मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटकसत्र सुरु केलं. रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी रेटिंग वाढवण्यासाठी बीएआरसीच्या माजी कर्मचाऱ्यांनी केलेले ईमेल प्राप्त झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  ऑक्टोबर महिन्यात मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्यासंबंधात रिपब्लिक टीव्ही, बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी या चॅनल्सविरोधात एफआयआर दाखल केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.