परमबीर सिंह यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात चांदीवाल आयोगाकडून वॉरंट जारी करण्यात आले आहे. हे वॉरंट जामीनपात्र आहे. चांदीवाल आयोगाकडून ५0 हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. तसेच आयोगाने महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालकांना आदेश दिले आहेत की, एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याची हे वॉरंट देण्यासाठी नियुक्ती करावी. याअगोदर देखील परमबीर सिंह यांना चांदीवाल आयोगाने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, सिंह काही चौकशीला हजर राहिले नाहीत. जेव्हा आयोगाकडून शेवटची सुनावणी झाली तेव्हा आयोगाने कठोर भूमिका घेतली आणि सांगितले होते की, जर पुढील सुनावणीला सिंह हजर झाले नाहीत तर त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात येईल. सिंह यांना चांदीवाल आयोगासमोर हजर राहायचे होते. मात्र, ते हजर राहिले नाहीत. त्यानुसार त्यांच्या वॉरंटची कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई पोलिस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे प्रकरणात बदलीच्या कारवाईनंतर नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी उद्धव ठाकरे आणि पोलिस महासंचालक यांना पत्र लिहिले होते. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १00 कोटी वसूलीचे आरोप लावले होते. उच्च न्यायालयात याप्रकरणी एक याचिका दाखल झाली होती. त्यानुसार सीबीआयद्वारे चौकशीचे आदेश देखील देण्यात आले होते. राज्य सरकारनेही सेवानवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. ही समिती या संपूर्ण प्रकरणाची समांतर चौकशी करते आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.