आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

‘राज्यात सुरू असलेले डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का?

मुंबई : राज्यातील मंदिरे उघडण्यात यावी यासाठी विरोधकांकडून सुरू असलेल्या आंदोलनावर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात बोलतांना राज्याला मंदिरांची गरज आहे की, आरोग्य मंदिरांची गरज आहे? असा प्रश्न केला होता. दरम्यान, यावर भाजपाकडून प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांना प्रतिप्रश्न करण्यात आला आहे. ‘मंदिर आणि आरोग्य मंदिर या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री असंवेदनशीलता का दाखवित आहेत. राज्यात सुरू असलेले डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का? असा खोचक सवाल विचारित भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
‘डिस्को, बार, पब बाबत आपण काही बोलणार आहात का, याच उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. कट कमिशन आणि वाटाघाटी हा या ठाकरे सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का? कारण कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, आरोग्य सुविधा, सँनिटझर वाटप, सँनिटायझेशन या सगळ्या पुरवठा धारकांमध्ये जी काही कट कमिशनची प्रकरण समोर येतायत याच्यावर तुम्ही कधी भाष्य करणार आहात का?’ असे देखील शेलार म्हणाले. शेलार यांनी ठाकरे सरकारवर आरोप करत काही प्रश्न केले आहेत. ‘पब, रेस्टाँरंट, बार यांचे मालक यांच्याशी वाटाघाटी होतात आणि वाटाघाटी नंतर ते खुले होतात. कट कमिशन या धोरणाने तुम्ही निर्णय करता का? एक्साईजची कमाई हवी म्हणुन दारुची दुकाने उघडी केली, कामगारांचे कारण सांगून मॉल उघडलेत मग मंदिरांच्या बाहेर नारळ, अगरबत्ती, धुप, फुल विकणारे यांची उपासमार दिसत नाही? त्यांना जगण्याचा अधिकार नाही? मंदिरात किती लोक आले पाहिजेत या बद्दल करोनाचे नियम करुन बाहेर नारळ,अगरबत्ती, फुल विकणाऱ्याचे पोट भरु शकत नाही का?’
‘मुख्यमंत्री आरोग्य केंद्राबाबत बोलतात तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. ठाणे जिल्ह्यामधे आदिवासी पाड्यातील ७४१ बालकांचा ६ महिन्यात मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कुठे आहे आरोग्य व्यवस्था, कुठे आहेत आरोग्य केंद्रे? कुठे आहेत पायाभुत सुविधा? महानगरपालिकेच्या रुग्णालयात डोळा कुरतडून खाल्ला म्हणुन मृत्यू, सायन ते नायर शवाच्या बाजूला जिवंत माणसाची ट्रिटमेंट, कोविड सेंटरमध्ये टॉयलेट मधे मृत्यू आणि आता बालकांचा मृत्यू, थोडी तरी संवेदनशीलता मुख्यमंत्री दाखवावी’, असे शेलार म्हणाले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.