आसाम : शहीद पोलिसांसाठी 3 दिवसांचा राजकीय दुखवटा

गुवाहटी, 27 जुलै : आसाम- मिझोराम सीमा वादात सोमवारी आसाम पोलिसांचे 6 जवान शहीद झालेत. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आसाम सरकारने राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केलाय. या काळात राष्ट्रध्वज निम्माच फडकवला जाणार आहे.

सीमावादात मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करण्याची आसाम सरकारने घोषणा केली आहे. तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये दिले जाणार आहे. मिझोरामच्या हल्ल्यात आसाम पोलिस अधीक्षक वैभव निंबाळकर गंभीर जखमी झाले असून त्यांना एअर एम्ब्युलन्सने मुंबईला उपचारासाठी नेण्यात आलेय. निंबाळकर हे मूळचे महाराष्ट्रातील बारामतीचे रहिवासी आहेत. ते आसाम कॅडरचे अधिकारी आहेत. अनेक वर्षांपासून आसाम-मिझोराम यांच्यात सीमा संघर्ष आहे. दोन्ही राज्यातील वादग्रस्त सीमा ओलांडून आसाम पोलिसांनी कथितरित्या मिझोराममधील कोलासिब येथील एका पोलीस चौकीचा ताबा घेतल्यानंतर तेथे हिंसाचाराला तोंड फुटले. यावरून सोमवारी उसळलेल्या रक्तरंजित संघर्षात सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. आसामच्या बराक खोऱ्यातील कछर, करीमगंज आणि हैलकांडी यांची मिझोरामच्या ऐझॉल, कोलासिब आणि मामित या तीन जिल्ह्य़ांना लागून 164 किलोमीटरची सीमा आहे. त्याबाबत दोन्ही राज्यांमध्ये वाद आहे.

आसाम- मिझोरम सीमावर मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की ते आरक्षित वन क्षेत्र आहे. सॅटेलाईट इमेजिंगच्या मदतीने आपण अतिक्रमण झाल्याचे पाहू शकता. आसाम सरकारने कायदेशीर खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा काही राजकीय मुद्दा नाही. तर दोन राज्यांमधील सीमावाद आहे. हा वाद खूप काळापासून सुरू आहे. दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस सरकार होते. तेव्हाही सीमावाद होता. मुख्यमंत्री शर्मा म्हणाले, की गोळीबारी चालू असताना मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांना सहा वेळा फोन केला. तेव्हा त्यांनी सॉरी म्हटले. मला आयझॉल येथे येऊन बोलण्यास सांगितले. आमची एक इंच जमीन कोणीही घेऊ शकत नाही. आम्ही क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी कटिबद्ध आहोत. जखमी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उत्तम उपचार करण्याची डॉक्टरांना सूचना केल्याचे शर्मा यांनी आणखी ट्विट केले आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.