लोकशाहीसाठी ‘बीट कॉन्स्टेबल’ सर्वात महत्त्वाची व्यक्ती : गृहमंत्री शाहा

नवी दिल्ली : लोकशाही व्यवस्था यशस्वी बनविण्यासाठी पोलीस प्रणालीतील सर्वात कनिष्ठ पातळीवर कर्तव्य बजाविणारा ‘बीट कॉन्स्टेबल’ हा महत्त्वूर्ण घटक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी शनिवारी केले. तसेच गत दोन वर्षांत देशात जवळपास ३,७०० सशस्त्र बंडखोरांनी आत्मसमर्पण केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
पोलीस संशोधन व विकास ब्यूरो अर्थात बीपीआरडीच्या ५१ व्या स्थापनदिनाच्या औचित्यावरील कार्यक्रमात बोलताना शहा यांनी पोलीस दलाचे कौतुक केले. जर देशात कायदा व सुव्यवस्था ठिकाण्यावर नसेल तर लोकशाही यशस्वी ठरू शकत नाही. पोलीस प्रणालीतील कनिष्ठ पातळीवरील सर्वात लहान तुकडीचा प्रभारी ‘बीट कॉन्स्टेबल’ हा सर्वात प्रमुख आणि महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे, जो लोकशाही प्रणाली यशस्वी बनविण्यासाठी झटत असतो, असे शाहा म्हणाले. पुढचे दशक अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वूपर्ण ठरणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एक मजबूत देश आणि अर्थव्यवस्था म्हणून पुढे येण्याच्या दिशेने उंच उडी मारणार असल्याचे शाहा विविध केंद्रीय, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबोधित करताना म्हणाले. बीपीआरडीला पोलीस दलाला आणखी आधुनिक आणि मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचे आवाहन करत, शहा यांनी गत दोन वर्षांत विविध बंडखोर संघटनांचे ३७०० जणांनी शस्त्र टाकल्याचे म्हटले. तसेच शनिवारी सायंकाळी आसाममधील कार्बी आंगलांगच्या एका बंडखोर गटासोबत करार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.