भाजपा मोदींच्या जन्मदिनी ‘सेवा व समर्पण अभियान’ राबविणार

नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त येत्या १७ तारखेपासून २० दिवसांचा ‘सेवा व समर्पण अभियान’ नामक एक मेगा इव्हेंट आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्त तब्बल ५ कोटी पोस्टकार्डांसह होर्डिंग्जद्वारे मोदींचे आभार मानले जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या १७ तारखेला वाढदिवस आहे. त्यांनी ७ आॅक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती. तेव्हापासून आतापर्यंत सलग २० वर्षे ते सातत्याने विविध घटनात्मक पदांवर असल्यामुळे भाजपाने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी येत्या १७ तारखेपासून सलग २० दिवस देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून भाजपा जनमानसांत समर्पणाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निर्देशांनुसार, भाजपच्या देशभरातील बुथांवरून मोदींना तब्बल ५ कोटी पोस्टकार्डस् पाठवले जातील. तसेच मोफत अन्नधान्य व लसीकरणासंबंधी त्यांचे आभार मानण्यासाठी ठिकठिकाणी ‘धन्यवाद मोदी’चे होर्डिंग्जही लावण्यात
येतील. भाजपने मोदींच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी विशेष प्रदर्शने व रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचेही निर्देश दिलेत. ‘नमो अ‍ॅप’वरही यासंबंधी विविध व्हर्च्युअल कार्यक्रम होतील. विशेषत: लोकप्रतिनिधींना स्वस्त धान्य दुकानांवर जाऊन मोदींचे आभार मानणारे व्हिडीओ तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना
७१ शहरांत स्वच्छ गंगा अभियान राबवण्याचे निर्देश देण्यात आलेत. या सर्व कार्यक्रमांत दलित, आदिवासी व शेतकऱ्यांवर विशेष भर दिला जाईल. दरम्यान, २ आॅक्टोबर रोजी ‘गांधी जयंती’ दिनी स्वच्छता मोहीम राबवली जाईल. यात खादी व स्थानिक वस्तूंच्या वापरावर जोर दिला जाईल.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.