बेळगाव महापालिकेतील भाजपच्या विजयाने शिवसेनेला धक्का

मुंबईः बेळगाव महानगर पालिकेत महाराष्ट्र एकिकरण समितीची सत्ता येणार असल्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दावा फोल ठरला. भाजपने या महापालिकेत दणदणीत विजय मिळवल्यावर संतापलेल्या खासदार राऊत यांनी भाजपवर आपला राग काढला. मराठी माणूस हरल्यावर भाजप विजयाचे पेढे कसे काय वाटतो, या शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
बेळगाव निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले होते. या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने महाराष्ट्र एकिकरण समितीला पाठिंबा दिला होता. समितीची सत्ता येणार असल्याचा दावा खासदार राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. मात्र, ५८ सदस्य संख्या असलेल्या या महापालिकेत प्रत्यक्षात महाराष्ट्र एकीकरण समितीला निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. समितीला केवळ तीन जागा जिंकता आल्या. तर भाजपने ३५ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले. काँग्रेसला केवळ दहा जागांवर विजय मिळवता आला. मागील निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे तब्बल ३२ सदस्य निवडून आले होते. त्यामुळे निराश झालेल्या खासदार राऊत यांनी भाजपवर संताप व्यक्त केला. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही, या शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. समितीच्या पराभवामागे मोठे कारस्थान असल्याचा दावाही त्यांनी केला.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.