जर्जर रुग्णांच्या खिशावर दलालांचा दरोडा, आठशे रुपयांचं रेमडेसिवीर हजारोंच्या घरात..

Share This News

आठशे रुपयाचं रेमडेसीव्हीर विकलं जातंय कित्तेक हजारांना…
नागपूरः उपराजधानी नागपुरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय, अशी परिस्थिती असताना नागपुरातील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. एकिकडे महागड्या रुग्णालयांचा खर्च झेपत नसतानाच रुग्णांसाठी अत्यावश्यक ठरणारी रेमडेसीवीर इंजेक्शन्स चक्क काळ्या बाजारातून खरेदी करण्याची पाळी नातेवाईकांवर येत आहे. आठशे रुपये एमआरपीच्या इंजेक्शनसाठी काळ्या बाजारात चक्क ५० हजार रुपये देखील आकारले जात असल्याचे धक्कादायक वास्तव उपराजधानीत दिसत आहे.
कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांवर उदरनिर्वाहाचे साधन गमावण्याची पाळी आली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. व्यापाऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. अनेक कुटुंबांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या बिकट परिस्थितीत कुटुंबातील एखादी व्यक्ती कोरोनाच्या संसर्गाने आजारी झाल्यास काय परिस्थिती निर्माण होऊ शकते,

याची कल्पनाच केलेली बरी. एकिकडे रुग्णालयांची लाखोंच्या बिलांमुळे रुग्णांच्या कुटुंबीयांचे कंबरडे मोडण्याची पाळी येत असताना दुसरीकडे रुग्णासाठी आवश्यक रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा काळाबाजार करणाऱ्या असामाजिक तत्वांच्या पथ्यावर पडतो आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनची एमआरपी ८०० रुपये आहे. पण या इंजेक्शनसाठी कुठे चार हजार, दहा हजार आणि कुठे तर पन्नास हजार रुपये देखील आकारले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. रेमडेसीवीरसाठी हजारो रुपये मोजल्याची कबुली अनेक रुग्णांचे नातेवाईक देत आहेत. एका रुग्णांचे निकटवर्तीय असलेले शैलेंद्र मेश्राम यांनी सांगितले “रुग्णालयात गंभीर अवस्थेत असलेल्या माझ्या नातेवाईकाला रेमडेसीवीरची गरज पडली. आम्ही औषधांच्या मोठ्या दुकानांमध्ये देखील चौकशी केली. पण तब्बल दोन दिवस आम्हाला हे इंजेक्शन कुठेच उपलब्ध झाले नाही.

अखेर हे इंजेक्शन चार हजार रुपयांना एका व्यक्तीने उपलब्ध करून दिले. हा खर्च आम्ही कसाबसा सोसला आहे…”
कोव्हीड रुग्णालयांपुढे रुग्णांचे असे अनेक चिंताक्रांत नागरिक आढळून येतात. रेमडेसीवीर उपलब्ध करण्यासाठी किती पायपीय करावी लागली, याची कबुलीच ते देतात. “माझा कोरोना संसर्गाने आजारी असलेला भाऊ डॉ. बाभुळकर यांच्या रुग्णालयात दाखल आहे. त्याला रेमडेसीवीरची गरज भासल्यावर आम्ही अनेक फार्मसी पालथ्या घातल्या. पण, हे इंजेक्शन कुठेच उपलब्ध झाले नाही. काही लोकांनी हे इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी चक्क ५० हजार रुपयांपर्यंतची मागणी केली…” अशी धक्कादायक माहिती अशाच एका रुग्णाच्या नातेवाईक डॉ. सुरुची अग्निहोत्री नाईक यांनी शंखनादशी बोलताना दिली. “इतकी मोठी रक्कम कशी उभारायची असा प्रश्न असताना समीर चित्रे, मुकुल चिमोटे हे सहकारी मदतीला धावून आले व त्यांनी इंजेक्शन्सची व्यवस्था केली” असे डॉ. नाईक यांनी सांगितले. यापैकी सामाजिक कार्यकर्ते मुकुल चिमोटे यांनी बरीच धावपळ करून अनेकांशी या विषयावर संवाद साधला. ही गंभीर समस्या केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या कानावर घालण्यात आल्यावर गडकरी यांनी रेमडेसीवीर कंपनीशी संपर्क साधून नागपुरात या इंजेक्शनच्या पुरवठ्याची व्यवस्था केली, असा उल्लेखही डॉ. नाईक यांनी यावेळी बोलताना केला.
शंखनादने नागपुरातील काही औषध विक्रेत्यांकडून परिस्थिती जाणून घेतली असता रोज कितीतरी लोक या इंजेक्शनसंबंधी विचारणा करण्यासाठी आमच्याकडे येत असल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले. मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यल्प असल्याने इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहे. त्यातच बाहेर इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याची कबुलीही औषध विक्रेते दबक्या आवाजात देत आहेत.
दरम्यान, रेमडेसीवीरच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयानं त्याच्या पुरवठ्यावर नियंत्रण आणलं आहे. त्यानुसार आता ही इंजेक्शन्स कोव्हीड रुग्णांसाठीच असलेल्या हॉस्पिटलन्सना पुरविली जाणार आहेत. ती अनधिकृत व्यक्तींकडे जाणार नाहीत, अशी व्यवस्था केली असल्याचा दावा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होत आहे. इंजेक्शनचा सरसकट वापर टाळून ती केवळ गरजू रुग्णांना पुरविण्यात यावी, त्याची साठेबाजी करण्यात येऊ नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडून केले जात आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बिघडली असताना रुग्णालयांमधील उपचार आणि औषधांच्या भरमसाठ खर्चामुळे अनेक कुटुंब आर्थिक दृष्टीने उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे विदारक चित्र समाजात बघायला मिळत आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.