ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन; छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांवर गुन्हा

नंदकुमार बघेल यांनी नुकतेच उत्तर प्रदेशमध्ये केले होते वादग्रस्त वक्तव्य

रायपूर : ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करून सांप्रदायिक शांतता भंग केल्याप्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांचे वडील नंदकुमार बघेल यांनी नुकतेच उत्तर प्रदेशमध्ये हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘मी भारतातील सर्व गावकऱ्यांना आवाहन करतो की, ब्राह्मणांना तुमच्या गावात येऊ देऊ नका. मी इतर सर्व समुदायाशी देखील यांसंदर्भात बोलेल, जेणेकरून आपण त्यांच्यावर बहिष्कार टाकू शकू. ब्राम्हणांना व्होल्गा नदीच्या तीरावर परत पाठवण्याची गरज आहे,’ असे नंदकुमार बघेल म्हणाले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, या देशात कायदा सर्वोच्च आहे आणि त्यांचे सरकार सर्वांसाठी आहे. ‘कोणीही कायद्याच्या वर नाही, जरी ती व्यक्ती माझे ८६ वर्षांचे वडील असले तरीही. छत्तीसगड सरकार प्रत्येक धर्म, पंथ, समुदाय आणि त्यांच्या भावनांचा आदर करते. माझे वडील नंदकुमार बघेल यांनी एका विशिष्ट समुदायाविरोधात टिप्पणी केली आहे. त्यांनी सांप्रदायिक शांतता भंग केली असून त्यांच्या वक्तव्यामुळे मलाही दु: ख झाले आहे,’ असे मुख्यमंत्री बघेल म्हणाले.
‘माझे आणि माझ्या वडिलांचे राजकीय विचार आणि विश्वास वेगळे आहेत. एक मुलगा म्हणून मी त्यांचा आदर करतो पण मुख्यमंत्री म्हणून मी त्यांची अशी चूक माफ करू शकत नाही, ज्यामुळे राज्यातील सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता बिघडू शकते,’ असेही मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.