डिजिटल नियम लागू करण्यासाठी केंद्र सरकारचा ट्विटरला निर्वाणीचा इशारा

नवी दिल्लीः नवी डिजिटल नियमावली लागू न केल्यास त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होतील, असा इशारा केंद्र सरकारने ट्विटरला दिला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला पत्र पाठवून नव्या डिजिटल नियमांची अंमलबजावणी न केल्याबद्धल स्पष्टीकरण मागितले आहे. नवे नियम त्वरीत लागू करावे अथवा कारवाईस तयार रहावे, असा इशारा मंत्रालयाने दिला आहे. नियमांच्या अंमलबजावणीसाठी ट्विटरने अद्याप भारतात जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती देखील केलेली नाही. ट्विटरच्या भारतातील कार्यालयाचा पत्ता चुकीचा असल्याचे आढळून आले आहे. ट्विटरने नियमांची अंमलबजावणी न केल्यास आयटी कायद्यांतर्गत मिळणारे संरक्षण काढून घेतले जाऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्र सरकारने २६ मे रोजी नवीन डिजिटल धोरण लागू केले आहे. त्यापूर्वी ट्विटर, फेसबूक आणि व्हॉट्सअप या कंपन्यांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. दरम्यान, या वादात आणखी एका वादाची भर पडली आहे. ट्विटरने उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत या नेत्यांच्या वैयक्तिक अकाऊंटवरील निळे टिक काढून टाकले आहे. मात्र, त्यानंतर काही तासातच ते व्हेरिफाय करून पुर्ववत करण्यात आले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.