चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊतांवर पलटवार

‘कोथळा काढायला हातात जे शस्त्र घ्यायला लागते ते पेलवण्यासाठी विश्वासघातक्यांच्या दंडात ताकद आहे का?

मुंबई : संजय राऊत यांनी काल(शनिवार) जुन्नर येथील एका कार्यक्रमात बोलताना, चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला असल्याच्या केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. आम्ही समोरून कोथळा काढतो मागून नाही. पाठीमागून वार करण्याची शिवसेनेची परंपरा नाही. असे संजय राऊत म्हणाले होते. तसेच, शब्द तुम्ही फिरवला आम्ही नाही, असे देखील यावेळी त्यांनी बोलून दाखवले होते. त्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे. ‘कोथळा काढायला हातात जे शस्त्र घ्यायला लागते ते पेलवण्यासाठी विश्वासघातक्यांच्या दंडात ताकद आहे का? आता भाजपा प्रामाणिक मित्रपक्षांसोबतच येणाऱ्या सर्व निवडणूका लढेल आणि जिंकेल!’ असे चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
तसेच, ‘लोकसभा निवडणुकींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागितली, त्यांच्याच नावाचा वापर करून राज्यात खासदार म्हणून निवडून आले. मात्र, आता शिवसेनेच्या १८ खासदारांनी भाजपाविना राज्यात जिंकून दाखवावे! खरा लढा आता सुरू झाला आहे.’ असे देखील चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला खुले आव्हान दिलेले आहे.
मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या निशाण्यावर आहेत. पाटील या दोघांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. औरंगाबाद दौऱ्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याचे दिसून आले. करोनाची तिसरी लाट येईल की नाही, हे सांगायला मी उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर किंवा संजय राऊतांसारखा कंपाउंडर नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. तसेच करोना फक्त उद्धव ठाकरे यांच्याशीच बोलतो, असेही ते म्हणाले होते. या अगोदर विदर्भात भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, ‘पोपटाचा प्राण सत्तेमध्ये आहे!; पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी मुंबई महानगरपालिका जिंका आणि महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणा, हेच एकमेव उत्तर आहे.’ तसेच, अरविंद सावंत यांनी भाजपाची मदत न घेता मुंबईत खासदार होऊन दाखवावे, असे जाहीर आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले होते.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.