घुग्घुस नगरपरिषदेच्या गोदामाला आग

चंद्रपूर 8 सप्टेंबर : घुग्घुस नगरपरिषदेच्या गोदामाला अचानक आग लागल्याची घटना बुधवारी पहाटे सव्वापाच वाजता उघडकीस आली. दरम्यान सदर आग अर्धा तासाच्या आतच आटोक्यात आली.

डिसेंबर २०२० मध्ये घुग्घुस ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर झाले होते. काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेला मुख्याधिकारी म्हणून आर्शिया शेख यांची नियुक्ती देखील झाली. येथील तहसीलदार निलेश गौंड यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. नगर परिषदेचे कामकाज काही प्रमाणात सुरू झाले असून नगरपरिषदेच्या मुख्य इमारतीच्या समोर ग्रामपंचायतची जुने कौलारू गोदाम आहे. ते सध्या बंदच असून पहाटे सव्वापाच वाजताच्या दरम्यान तेथून धूर येताना चौकीदाराला दिसला. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. एसीसी सिमेंट कंपनीच्या अग्निशमन दलाच्या एका गाडीने आगीवर अर्धा तासाच्या आत नियंत्रण मिळण्यात आले. सदर आगीत जुनी रद्दी, टाकाऊ साहित्य जाळले आहे. काही दस्तऐवज बाहेर काढण्याचे काम करण्यात येत असून आगीत अजून किती नुकसान झाले हे तूर्त समजले नसले तरी शॉट सर्किटने सदर आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.