छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक

ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्याचे विधान भोवले

रायपूर : ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्याचे वक्तव्य छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी नंदकुमार बघेल यांना पोलिसांनी अटक केली आहे. नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रायपूर पोलिसांनी नंदकुमार बघेल यांना अटक केली असून कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.
ब्राह्मण समाजाविरुद्ध अपमानास्पद शेरेबाजी केल्याच्या आरोपाखाली छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्याविरुद्ध रायपूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. ‘सर्व ब्राह्मण समाज’ या संघटनेच्या तक्रारीच्या आधारे डी. डी.नगर पोलिसांनी शनिवारी उशिरा रात्री बघेल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. धर्म, वंश इ. आधारावर वेगवेगळ्या समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे यांसह इतर आरोपांखाली भादंविच्या विविध कलमांखाली हे प्रकरण नोंदविण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी अलीकडेच ब्राह्मण हे परकीय असल्याचे सांगून त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन लोकांना केले, तसंच ब्राह्मणांना आपल्या गावात प्रवेश करू देऊ नका, असेही सांगितले, असे संघटनेने तक्रारीत म्हटले होते. ब्राह्मणांना देशातून ‘घालवून द्या’ असेही आवाहन ते लोकांना करत असल्याचा आरोप त्यांनी बघेल यांच्यावर केला होता. यापूवीर्ही मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी भगवान श्रीरामाविरुद्ध कथितरीत्या अपमानास्पद शेरेबाजी केली होती, असे तक्रारीत म्हटल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले होते. उत्तर प्रदेशात एका कार्यक्रमात भाषण करताना नंदकुमार बघेल यांनी ही शेरेबाजी केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. दरम्यान, वडिलांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर, अशा शेरेबाजीमुळे आपल्याला दु:ख झाल्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले होते. आपल्या राजवटीत कुणीही कायद्यापेक्षा मोठा नसून, या प्रकरणी पोलीस योग्य ती कारवाई करतील असे ते म्हणाले होते.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.