मुख्यमंत्री ठाकरेच घोषणा करणार होते पण…

Share This News

मुंबई: महाराष्ट्रात ब्रेक द चेन अंतर्गत आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ताज्या आदेशात लॉकडाऊन हा शब्द वापरण्यात आला नसला तरी पूर्वीच्या लॉकडाऊनसारखेच कठोर निर्बंध आता असणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधून याबाबत घोषणा करणार होते मात्र, नाशिकमधील ऑक्सिजन गळती दुर्घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी हा संवाद रद्द केल्याचे कळते.
राज्यात करोना संसर्गाने थैमान घातले आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊन लावला जाणार असे स्पष्ट संकेत मिळाले होते. राज्यात कडक निर्बंध लागू करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी फेसबुक तसेच इतर माध्यमांतून जनतेशी लाइव्ह संवाद साधून जाहीर करतील असेही सांगण्यात येत होते. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर तशी विधाने अनेक प्रमुख मंत्र्यांनी केली होती. मात्र, नाशिकमध्ये आज महापालिका रुग्णालयात ऑक्सिजन गळती होवून २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला ऑनलाइन संवाद रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे. त्या ऐवजी हा निर्णय राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या मार्फत जाहीर करण्यात आला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.