पतंगीचा मोह बेतला जीवावर

रेल्वेला धडकून बालकाचा मृत्यू : कोराडी परिसरातील घटना

आठ दिवसातील तिसरी घटना
गेल्या आठ दिवसांमध्ये पतंगीच्या नादात जीव गेल्याची ही तिसरी घटना आहे. एमआयडीसीमध्ये कारला धडक लागून १३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. मानकापूरमधील मृत आदित्यचा नॉयलॉन मांजामुळे गळा चिरला आहे.

दरवर्षी तिळसक्रांतीचा सण जसजसा जवळ येतो शहरात पतंगीच्या नादात शाळकरी मुलांचा जीव जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असते. पालकवर्ग मुलांना कितीही समजावत असलेतरी पतंग उडविण्याच्या नादात पाल्य त्यांच्या सांगण्यावर दुर्लक्ष करीत असल्याने अशा घटना सातत्याने घडतात. असाच काहीसा प्रकार कोराडी परिसरात घडल्याने कटलेली पतंग पकडण्याच्या नादात १२ वर्षीय बालकाचा रेल्वेला धडकून मृत्यू झाल्याचे हृदय पिळवून टाकणारी घटना घडली. एन्टा विनोद सोलंकी (वय १२) असे मृत बालकाचे नाव आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शिवकृष्ण धाम झोपडपट्टीच्या मागील भागात बुधवारी वॉक्स कुलर कंपनीजवळील उडाणपुलाखाली एन्टा सकाळपासून कटलेल्या पतंगी जमा करीत होता. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान नागपूर-दिल्ली रेल्वे मार्गावर कटलेल्या पतंगी पकडण्याकरिता पतंगीकडे एकटक नजर ठेवून सैरावैरा धावत होता. नेमके याचवेळी रेल्वे लाईनवरून समोरून भरधाव रेल्वे आली. मृत एन्टाला काही समजण्यापूर्वी रेल्वेने त्याला जोरदार धडक दिली. यात तो घटनास्थळीच गतप्राण झाला. अचानक घडलेल्या घटनेमुळे आजुबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लागलीच भ्रमणध्वनीवरून स्थानिक पोलिस ठाण्याला संपर्क साधून घटनेची सूचना दिली. माहिती मिळताच कोराडी पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीकरिता मेयो रुग्णालयात रवाना करून अपघाती मृत्यूची नोंद केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.