चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसला विशेष अधिकार दिलेत का?

पुणे : महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्या पक्षाकडे गृहखात देण्यात आले आहे, त्यांना मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिकार दिलेत का? असा सवाल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. मारहाण झालेल्या पुणे जिल्ह्यातील महिला सरपंच गौरी गायकवाड यांची भेट वाघ यांनी घेतली त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी या प्रकरणी सरकारसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले.
त्या म्हणाल्या, ‘मी मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला आहे की, ज्या पक्षाला तुम्ही गृहखात दिले आहे. त्यांना तुम्ही विशेष अधिकार दिले आहेत का? त्यांच्या आमदारांना, कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या महिला अधिकारी किंवा महिला सरपंचांना अशा प्रकारची हीन वागणूक द्या. त्यांना गलिच्छ शिवीगाळ करा, मारा, वाट्टेल त्या पद्धतीने त्यांच्याशी वागा असे त्यांना काही अधिकारी दिलेत का? हे मी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. ‘वाईट या गोष्टीचे वाटते की, या महिला सरपंचाला इतकी मारहाण होऊनही त्याची दखल घेतली जात नाही. सरकार तर नाहीच नाही पण प्रशासकीय यंत्रणा पण इतकी थंड पडली. आजपर्यंत महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे इतके धिंडवडे निघालेले आम्ही कधीही बघितलेले नाहीत. आज दिवसाढवळ्या बायकांवर हल्ले होतात, बाईच्या कानफटात मारेपर्यंत यांची हिंमत वाढलीये. कुठून येते ही हिम्मत? एका बाईची तर बोटेच तोडून टाकली. दुसऱ्या बाईला अ‍ॅट्रॉसिटीच्या नावाखाली धमक्या दिल्या जात आहेत, असे प्रश्नही यावेळी चित्रा वाघ यांनी उपस्थित केले. आता आम्ही विचारु का? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? किती वाताहात करुन ठेवली महाराष्ट्राची याची उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावी लागतील. कारण शेवटी ते या कुटुंबाचे प्रमुख आहेत आणि आम्ही सर्वजण या कुटुंबाचे सदस्य आहोत. त्यामुळं गौरी गायकवाड यांच्या मारहाणीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी. त्यांनी संबंधितांना याचा जाब विचारावा आणि याचे स्पष्टीकरण महाराष्ट्राला द्यावे, अशी मागणीही यावेळी वाघ यांनी केली.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.