50 हून अधिक वय असलेल्या नागरिकांना मार्चमध्ये लस टोचणार – आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

50 वर्षाहून अधिक वय असलेल्या नागरिकांना लवकरच कोरोनाची लस टोचण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे. तसेच देशात आतापर्यंत 50 लाखहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

डॉ. हर्षवर्धन यांनी लोकसभेत सांगितले की मार्चच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात 50 हून अधिक वय असलेल्या नागरिकांना कोरोनाची लस टोचण्याची प्रक्रिया सुरू होईल. देशात सध्या सात कोरोना लसींवर काम सुरू आहे. यापैकी तीन लसींवर क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. तर दोन लस ट्रायलच्या पहिल्या टप्प्यात असून दोन लस प्री क्लिनिकल टप्प्यांत आहेत.

केंद्र सरकारने एक कोटी आरोग्य कर्मचार्‍यांना लस टोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानंतर पुढील टप्प्यांत दोन कोटी आरोग्य कर्मचार्‍यांना लस टोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या लसीकरणासाठी 480 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.   

जगात हिंदुस्थानात सर्वाधिक वेगाने लसीकरण सुरू आहे. अवघ्या 21 दिवसांत 50 लाखहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 24 दिवसांत अमेरिकेत 50 लाख, इंग्लंडमध्ये 43 तर इस्राईलमध्ये 45 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.