विदर्भ, मराठवाडा, कोकणासह उत्तर महाराष्ट्रात थंडीची चाहूल.

नागपूर, ९ नोव्हेंबर विदर्भ, मराठवाड्यातील परभणीसह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगावसह कोकणात तापमानाचा पारा घसरत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी शेकोटी लावून ऊब घेताना पाहायला मिळत आहे. रात्रीच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून सरासरी ५ ते ७ अंश सेल्सिअसने घट झाल्याचे अनुभवायला मिळत आहे.
विदर्भातील बहुतांश भागातील पारा घसरला
किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सुमारे ६ अंशांपर्यंत घट झाल्यास हवामान शास्त्राच्या निकषांनुसार ती थंडीच्या लाटेची स्थिती समजली जाते. नोव्हेंबरच्या पंधरवडय़ानंतर काही भागांत ही स्थिती निर्माण होते. मात्र, नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात गेल्या चार दिवसांपासून विदर्भातील बहुतांश भागातील पारा घसरला आहे. चंद्रपूरमध्ये सलग चौथ्या दिवशी राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाडय़ातही गारठा वाढतो आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानातील घट कायम असून, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात चढ-उतार सुरू आहेत.
राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद 
रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तब्बल ८ अंश सेल्सिअसने घट होऊन चंद्रपूरमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात थंडीच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी या ठिकाणी राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. विदर्भातील इतर ठिकाणीही तापमानातील घट कायम आहे. याशिवाय मराठवाडय़ातील परभणी आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगावमध्येही तापमानाचा पारा घसरला आहे.
चंद्रपूरपाठोपाठ विदर्भामध्ये अकोला (१३.२), अमरावती (१३.३) या भागांतील किमान तापमान सरासरीपेक्षा ५ अंशांनी कमी झाले आहे. नागपूर (१३.४), वर्धा (१३.४) या भागातही रात्रीचा गारवा आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक (१२.६), जळगाव (१३.०) येथेही तापमानातील घट कायम आहे. मध्य महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर वगळता इतर सर्वत्र किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत काही प्रमाणात खाली आहे. मराठवाडय़ातील परभणीमध्ये (१२.०) तीन दिवसांपासून तापमानात मोठी घट दिसून येत असून, औरंगाबाद, नांदेडमध्येही तापमानात घट झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.