बर्ड फ्ल्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी समिती – रवींद्र ठाकरे

जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूच्या संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी व परिणामकारकपणे राबविण्यासाठी उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा संसर्ग टाळण्यासाठी ही समिती कार्य करणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे यांनी सांगितले आहे.

 जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूने कोंबड्या दगावल्याने या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या नियंत्रणात संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, पशुधन विकास अधिकारी, वनपरीक्षेत्र अधिकारी, उप अधीक्षक भूमी अभिलेख आणि पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचा समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश राहणार आहे.

 प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 आणि संसर्गांचा प्रतिबंध, नियंत्रण आणि एव्हीयन इन्फ्लूएन्झापासून बचाव, नियंत्रण व प्रतिबंधासाठी कृती योजना तसेच महाराष्ट्र शासन कृषी व पदुम  विभागाच्या अधिसूचनेनुसार समिती गठीत करण्यात आली आहे.

 बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाचा प्रसार होणार नाही यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेणे, समितीच्या कामकाजामध्ये समन्वय, बाधित क्षेत्रात पंचनामा करुन कामाकाजाचे सनियंत्रण करणे, आवश्यक साहित्याचा साठा करणे, मृत वा बाधित पक्ष्यांची खाद्य, अंडी व कुक्कुटगृहातील बाधित वस्तूंची विल्हेवाट लावण्याची जागा उपलब्ध करुन देणे, संपूर्ण क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करणे, मृत वा इतर नमुने पुणे येथे पोहोचविण्यासाठी विशेष वाहनाची व्यवस्था करणे हे या समितीचे कामकाज राहणार आहे.

प्रभावित पोल्ट्री फार्म परिसरातील नागरिकांच्या हालचाली तसेच इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करणे, बाधित पक्ष्यांची विल्हेवाट लावताना नागरिकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घेणे, पक्षी वा खाद्यान्नाची वाहतूक आणि चिकन शॉप बंद ठेवणे, जलद कृती संघातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी करणे, पीपीई किटचा पुरवठा करणे तसेच योग्य ती ॲन्टीव्हायरल औषधे उपलब्ध करुन देणे, मृत पक्ष्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी जेसीबी व सक्शन मशीन, फॉगर मशीन स्प्रे मशीन साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.