अमरावती : मुख्याध्यापकावर गुन्हे दाखल करा; पोलीस ठाण्यात तक्रार

अमरावती, ४ जानेवारी
मतदार म्हणून पात्र नसतांनाही मतदार यादीत आपल्या विद्यालयातील शिक्षकांची बनावट नावे शिक्षक मतदार संघ यादीत समाविष्ट करणाऱ्या नारायणा विद्यालय, अमरावती येथील मुख्याध्यापकावर 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिक्षक महासंघाचे शेखर भोयर यांनी राजापेठ पोलीस स्टेशनला केली आहे.                
भारत निर्वाचन आयोग यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा  ( Representation of the people Act 1950) च्या भाग (27) (ब) नुसार शिक्षक मतदार संघातील मतदानास पात्र असलेल्या मतदारांची पात्रता नमूद केली आहे.त्यानुसार त्या मतदाराने अथवा शिक्षकाचे प्रश्न शासनाशी निगडित असले पाहिजे , तो माध्यमिक पेक्षा (Secondary Level) कमी दर्जाचा नसावा असे नमूद केले आहे. परंतु अमरावती विधानपरिषद शिक्षक मतदार संघ निवडणुकीमध्ये अमरावती मधील नारायणा विद्यालय, अमरावती यामधील मतदार म्हणून पात्र नसलेल्या शिक्षकांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे.यामध्ये नारायणा विदयालयामधील 36 शिक्षकांची नोंदणी झाली आहे.   
मतदार म्हणून तहसील कार्यालयामध्ये नोंदणी करावयाची असल्यास त्यासाठी सदर शाळेच्या मुख्याध्यापकाचे स्वाक्षांकन व प्रमाणीकरण असणे आवश्यक आहे.यामध्ये नारायणा विद्यालयामधील मुख्याध्यापकाने कुठलाच विचार न करता हेतुपुरस्सरपणे जाणीवपूर्वक माहिती असूनही अपात्र शिक्षकांची नावे मतदार यादीमध्ये दाखल केलेली आहेत.हा निवडणूक कायद्याचा भंग असून सदर प्रकरणाची चौकशी करून खोटे प्रमाणीकरण करून देणाऱ्या नारायण विद्यालयामधील मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शेखर भोयर यांनी राजापेठ पोलीस स्टेशनला केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.