शासकिय बैठकीच्या नावावर कॉग्रेसचा मेळावा, आमदार सावरकर यांचा आरोप

Share This News

नागपूरः राज्याचे मंत्री सुनील केदार यांनी शासकीय बैठकीच्या नावावर चक्क काँग्रेसचा मेळावा आयोजित केल्याची घणाघाती टीका आमदार टेकचंद सावरकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
आमदार सावरकर यांनी सांगितले की, मंत्री सुनील केदार यांनी सोमवारी कामठी तालुक्यात शासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीचे आपल्याला निमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार आपण बैठकीत उपस्थित झालो. पण, शिष्टाचारानुसार आपल्याला मंचावर खुर्ची देण्यात आली नाही. त्याऐवजी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना जागा देण्यात आले. या बैठकीस आपल्याला बोलण्यास मज्जाव करण्यात आला. बोलण्याचा प्रयत्न केला असता काँग्रेसचे महासचिव सुरेश भोयर व कार्यकर्ते आपल्या अंगावर धावून आले व शिवीगाळ करू लागले. त्यामुळे ही बैठक काँग्रेसचा मेळावा आहे की शासकीय बैठक, अशी विचारणा केली असता मंत्री केदार यंनी कोणतेही उत्तर दिले नाही. केदार यांच्याकडून सातत्याने आमदारांचा अवमान केला जातो, याकडे सावरकर यांनी लक्ष वेधले. केदार यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला व त्यामुळेच ते सावनेर मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी बैठका घेत असतात, असा आरोपही आमदार सावरकर यांनी केला. शासकीय खर्चात काँग्रेसचा मेळावा आयोजित करणे अत्यंत आक्षेपार्ह असून या प्रकरणाची आपण तक्रार करणार आहोत, असा इशाराही आमदार सावरकर यांनी दिला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.