काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे वादग्रस्त वक्तव्य

‘…तर ‘ते’ व्हिडीओ रामायणाचे होतील का?’

भंडारा : नाना पटोले यांनी राज कुंद्रा प्रकरणी केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. भाजपाकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर सूडाने कारवाई केली जात आहे. केवळ भाजपाविरोधी पक्षातील नेत्यांवर ही कारवाई केली जात आहे. मग भाजपामध्ये काय सगळीच दुधाने धुतलेली लोकं आहेत का?’ असा सवाल करत भाजपावर टीका करताना नाना पटोले यांनी राज कुंद्राप्रकरणावरून एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
‘राज कुंद्रा जर उद्या भाजपामध्ये गेले तर ज्या व्हिडीओमुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत ‘ते’ व्हिडीओ रामायणाचे आहेत असे भाजपा म्हणणार आहे काय?, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान, नाना पटोले यांच्या या विधानाची सध्या राजकीय वतुर्ळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. ‘भाजपामध्ये काय सगळीच दुधाने धुतलेली लोकं आहेत का? त्यांच्यापैकी कोणावरही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत का? त्यांच्यापैकी कोणाकडेही भ्रष्ट मालमत्ता नाही का? आणि या सगळ्याची माहिती ईडी आणि सीबीआयकडे नाही का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य लोकांनाही पडले आहेत’, असे यावेळी नाना पटोले म्हणाले. ते म्हणाले की, ‘केवळ भाजपाविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई होत असेल तर हे चुकीचे आहे. कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे. फक्त भाजपाचा विरोध केला म्हणून स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जाणार असेल तर हे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे, ज्यांनी चुकीची कामे केली आहेत त्यांच्यावर कारवाई करायलाच पाहिजे. त्याबाबत दुमत असण्याचे कारण नाही’, असेही ते म्हणाले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.