आरोग्य विभागाच्या जिल्ह्य़ांना सूचना

Share This News

मुंबई : रुग्णसंख्या कमी झाली तरी करोना संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बाधित रुग्णांच्या प्रमाणानुसार जिल्ह्य़ातील रुग्णालयांचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने जिल्ह्य़ांना दिल्या आहेत. तसेच करोना आणि बिगरकरोना उपचारांचा मेळ साधण्यासाठी आधुनिक सुविधांसह उपचार विशेष (सुपर स्पेशालिटी) रुग्णालये करोना रुग्णालये म्हणून ठेवण्याची आवश्यकता नाही, असे आदेशही सर्व जिल्ह्य़ांना दिले आहेत. यामुळे अन्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

करोना साथीच्या काळात सरसकट सर्वच आरोग्य व्यवस्था करोना केंद्री झाल्याने इतर आजारांच्या सेवा काही प्रमाणात खंडित झाल्या होत्या. आधुनिक उपचार देणारी सुपरस्पेशालिटी रुग्णालये करोना रुग्णालये म्हणून कार्यरत असल्याने तातडीच्या नसलेल्या अनेक शस्त्रक्रिया रखडलेल्या आहेत. संसर्गाची तीव्रता गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्याने आता इतर आजारांच्या सुविधाही उपलब्ध करण्याच्या उद्देशातून रुग्णोपचार व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्य़ांना दिले आहेत.

रुग्णसंख्येच्या प्रमाणानुसार करोना उपचाराची पूर्ण जबाबदारी जिल्हा आणि शहरातील विशिष्ट रुग्णालयांवर सोपवावी. सुपरस्पेशलिटी रुग्णालये करोना रुग्णालये ठेवण्याची आवश्यकता नाही, असे यात स्पष्ट केले आहे. जिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये करोना आणि इतर आजारांच्या सुविधांचा समतोल साधला जावा.

प्रत्येक तालुक्यासाठी विशिष्ट करोना निगा केंद्र (सीसीसी), करोना आरोग्य केंद्र (डीएचसी) आणि करोना रुग्णालये निश्चित करावीत. असे जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावरील करोना कृती दलाला सूचित केले आहे.

संसर्ग नियंत्रणासाठी क्षेत्रीय पातळीवर पथके

घरगुती विलगीकरणात अधिक रुग्ण असून यांची देखरेख करण्यासाठी जिल्हा आणि पालिका पातळीवर सूक्ष्मनियोजन करावे. रुग्णसंख्या कमी झाली तरी निकट सहवासितांचा सखोल शोध आणि तपासण्या कराव्यात. वृद्धाश्रम, स्थलांतरित मजूर वस्ती, औद्योगिक वसाहती इत्यादी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी विशेष लक्ष द्यावे. यासाठी उपकेंद्र आणि वॉर्डस्तरावर पथके कार्यरत करण्याचे सूचित केले आहे.

आदेशातील मुद्दे

’ बाधितांचे प्रमाण सात टक्क्यांपेक्षा कमी असल्यास रुग्णसंख्येनुसार जिल्हा आणि पालिका स्तरावर किमान पाच ते सात करोना रुग्णालये कार्यरत ठेवावीत.

’ सात ते दहा टक्के बाधितांचे प्रमाण असलेल्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि प्रत्येक शहरी आणि तालुका विभागातील एक रुग्णालय करोना रुग्णालय म्हणून कार्यान्वित करावे.

’ बाधितांचे प्रमाण ११ ते १५ टक्के असल्यास आवश्यकतेनुसार आणखी २० टक्के करोना रुग्णालये कार्यान्वित करावीत.

’ १६ ते २० टक्के बाधितांचे प्रमाण असलेल्या ठिकाणी विविध आजारांचे उपचार देणारी मल्टीस्पेशालिटी रुग्णालये करोनासाठी कार्यान्वित करावीत तर २० टक्क्यांहून अधिक बाधितांचे प्रमाण असल्यास करोनासाठी या आधी निवडलेली सर्व प्रकारची रुग्णालये करोना उपचारासाठी खुली करावीत, असे यात नमूद केले आहे.

उपचारांच्यादृष्टीने पुनप्र्रशिक्षण

करोना साथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात उपचाराच्या दृष्टीने प्रशिक्षण घेतले असले तरी दरम्यानच्या काळात नव्याने समोर आलेल्या बाबी, वैद्यकीय उपचार नियमावलीतील बदल या अनुषंगाने पुनर्प्रशिक्षण घेण्याचे आदेशही विभागाने दिले आहेत.

५० टक्के औषध साठा आवश्यक

करोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या काळात आवश्यक असलेल्या औषध आणि इतर सामुग्रीच्या किमान ५० टक्के औषधे नेहमी उपलब्ध राहतील, याची दक्षता रुग्णालय आणि जिल्हा किंवा महानगरपालिका स्तरावर घ्यावी. तसेच पुढील १५ दिवसांचा साठाही करून ठेवावा, असे आदेशही आरोग्य विभागाने दिले आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.