वायू प्रदूषणाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील मुंबई आणि चंद्रपूर हे सर्वाधिक प्रदूषित विभाग

Share This News

करोनाकाळातील प्रदुषणात ३० ते ५५ टक्क्यांनी घट

करोनापूर्वी राज्यातील प्रदूषणाच्या तुलनेत करोनाकाळातील प्रदूषण तब्बल ३० ते ५५ टक्क्यांनी कमी झाले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतेच जाहीर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या अहवालात एप्रिल ते डिसेंबर २०१९ आणि जानेवारी ते मार्च २०२० या काळातील प्रदूषणाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील घुग्घुस, चंद्रपूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, पुणे, रायगड, ठाणे, डोंबिवली, मुंबई, कल्याण, नवी मुंबई, कुर्ला, सायन, वरळी, मुलुंड, बांद्रा, कुलाबा, विलेपार्ले, कांदिवली, महापे, नेरुळ, सोलापूर ही औद्योगिक शहरे प्रदूषित क्षेत्राच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. वायू प्रदूषणाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील मुंबई आणि चंद्रपूर हे सर्वाधिक प्रदूषित विभाग आहेत. देशात एकूण २९ राज्यात आणि ३४४ शहरांमध्ये ७९३ प्रदूषण मोजणी केंद्र आहेत. महाराष्ट्रातील २५ शहरात ८४ वायु गुणवत्ता मोजणी केंद्र असून त्यातील २३ हे सतत वायू गुणवत्ता मापन केंद्र आहेत. यात सर्वाधिक ११ केंद्र मुंबईत तर आठ चंद्रपुरात आहेत. अहवालात  या शहरातील मागील नऊ वर्षांचे प्रदूषण तसेच करोनापूर्वी आणि नंतरची वायू प्रदूषणाची आकडेवारी देण्यात आली आहे. उद्योग, कोळसा ज्वलन, विविध वायू ज्वलन, वाहतूक, वाहने, कचरा, कचरा ज्वलन, बांधकाम तसेच रस्त्यावरील धूळ, घरगुती प्रदूषण असे वायू प्रदूषणाचे अनेक स्त्रोत आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा, प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार आणि शासनाच्या दिशानिर्देशानुसार उद्योगांनी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा लावाव्यात, शासनाने विविध विभागांना प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी बाध्य करावे, वृक्ष लागवड मोठय़ा प्रमाणात व्हावी, वाहनांचा वापर कमी व्हावा, या गोष्टींची अंमलबजावणी के ल्यास प्रदूषण निश्चितच कमी होऊ शकते, असे मत ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले.

सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

*  कल्याण, डोंबिवली, बांद्रा, कुलाबा, कुर्ला तसेच चंद्रपूर या शहरात प्रदूषणातील घटकांपैकी एक असणाऱ्या सल्फर डायऑक्साईडचे मर्यादेपेक्षा अधिक प्रमाण आढळले आहे.

*  नायट्रोजन डायऑक्साईडचे अधिक प्रमाण चंद्रपूर,मुंबईतील बांद्रा, कुर्ला, सायन, विलेपार्ले, वरळी, महापे परिसरात तसेच नाशिक, आणि सोलापूर येथे अधिक आढळले.

*  धुलीकणांचे अधिक प्रमाण घुग्घुस, चंद्रपूर, सायन आणि नेरळमध्ये अधिक आढळले.

*  सूक्ष्मधूलिकणाचे (पीएम २.५) प्रमाण कल्याण, पुणे, औरंगाबाद, डोंबिवली, नाशिक, कांदिवली, कुर्ला आणि मुलुंड येथे मर्यादेपेक्षा अधिक आढळले.

*  ओझोनचे प्रमाण चंद्रपूर, कल्याण, महापे, मुलुंड, आणि नागपूर येथे मर्यादेपेक्षा अधिक आढळले.

*  कार्बनवायूचे अधिक प्रमाण बांद्रा, डोंबिवली, नागपूर, कल्याण, सोलापूर, पुणे येथे मर्यादेपेक्षा अधिक आढळले.

*  बेन्झीनचे प्रमाण बांद्रा, कुलाबा, डोंबिवली, महापे, नागपूर, नाशिक, नेरुळ, कल्याण, कुर्ला, सायन, वरळी येथे मर्यादेपेक्षा अधिक आढळले


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.