जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर

Share This News

नागपूर
नागपूर शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा तांडव सुरू असून, परिस्थिती आता पूर्णपणे हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. दररोज मोठय़ा संख्येने मृतांसोबतच बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत असून, मेयो, मेडिकल, एम्ससारखी शासकीय रुग्णालयात रुग्णांकरिता बेड उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत नागरिकांना बेड उपलब्ध होणार, या प्रतीक्षेत तासन्तास शासकीय रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये प्रतीक्षा करावी लागत आहे. तर खासगी रुग्णालयांमध्येही बेड फुल्ल असल्यामुळे रुग्णांना रुग्णालयांच्या चकरा माराव्या लागत असून, एकंदरीत जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती ही आता हाताबाहेर गेली असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. तर गुरुवारी (८ एप्रिल) जिल्ह्यात कोरोना बाधितांसोबतच मृतांच्या संख्येने नवा उच्चांक गाठला आहे. दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ५५१४ नव्या बाधितांची भर पडली असून, ७३ जणांचा दुर्दैवी मृत्यूही झाला आहे.
फेब्रुवारीच्या मध्यावधीपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रकोपाने आता ‘विक्राळ’ रूप धारण केले आहे. दररोज बाधितांची संख्या वाढत असून, गंभीर संवर्गातील रुग्णही मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत असल्याची परिस्थितीत आहे. जिल्ह्यात वाढत असलेली रुग्णसंख्या ही आरोग्य व्यवस्थेला हलवून टाकणारी अशीच आहे. आज मेयो, मेडिकलसह इतर शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी खाटा उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. गंभीर संवर्गातील रुग्णसंख्या वाढत असल्याने व्हेंटिलेटर असलेले बेडही फुल्ल असल्याचे चित्र आहे. गुरुवारी (ता.८) जिल्ह्यात आजवरच्या सर्वात उच्चांकी म्हणजेच तब्बल ७३ जणांच्या मृत्यूची नोंद जिल्ह्यात प्रथमच झाली आहे. यामध्ये शहरातील ४0, ग्रामीणचे २८ व जिल्ह्याबाहेरील ५ जणांचा समावेश आहे. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ५५७७ वर जाऊन पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात ३२७७ जण ठणठणीत होऊन घरी परतलेत. यासोबतच एकूण कोरोनामुक्तांची संख्या २ लाख ९ हजार ६१ वर पोहोचली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८0.४९ टक्क्यांवर आले आहे. सद्यस्थितीत बाधितांची संख्या वाढत असल्याने सक्रिय रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे. आजघडीला जिल्ह्यात तब्बल ४५ हजार ९७ सक्रिय रुग्ण आहेत. यातील ७४.२९ टक्के म्हणजेच ३३ हजार ५0१ रुग्णांना लक्षणेच नसल्याने ते गृहविलगीकरणात आहेत. तर सौम्य, मध्यम व तीव्र अशी लक्षणे असलेले ११ हजार ५९६ जण शासकीय, खासगी रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.